एकनाथ शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेहमी चर्चेत असतात. सध्या राज्यात अतिवृष्टीने मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टिका केली आहे.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, “महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्यात पिकांचं नुकसान पाहण्यासाठी गेले होती की, जिल्हाधिकाऱ्यांना ‘दारू पिता का?’ विचारण्यासाठी. सैराट झाल्यासारखे महाराष्ट्राची सत्ता उलथापालथ करुन, सरकार स्थापन केलं. सरकारी अधिकाऱ्यांशी दारूच्या गप्पा मारता. त्यामुळे या सैराटच्या नादात मिंधे गट नसून, हा झिंगे गट झाला आहे,” अशा शब्दांत कायंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा : “मला जर विचाराल नोटेवर कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन बाळासाहेबांचा, कारण…”; अनिल परबांचं विधान
दरम्यान, सत्तार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे. “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो,” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.