शिवसेना पक्षातील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे झाले. या दसरा मेळाव्यांत दोन्ही गटांतील नेत्यांनी एकमेकांवर सडेतोड टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांना एकटे पाडू नका असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. दरम्यान, जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कलह प्रत्येकाच्याच घरात असतात. मात्र एखाद्याच्या घरातील विषय चव्हाट्यावर आणणे चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्यासोबत नाहीत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असे मनिषा कायंदे म्हणाल्या. त्या ‘एबीपी माझा’शी बोलत होत्या.
हेही वाचा >> उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी
कुटुंबातील तसेच जवळचे लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाहीत, असे त्यांना दाखवायचे आहे. त्यांना यातून काहीही मिळणार नाही. एखाद्याच्या कुटुंबात काही विषय असतील तर तुम्ही चव्हाट्यावर आणणार का? असे असेल तर तुमच्याही घरातील विषय बाहेर काढायला हवेत. उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय तिकडे गेले असतील तर तो अंतर्गत विषय आहे. हा राजकीय विषय नाही. त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे मनिषा कायंदे म्हणाल्या.
हेही वाचा >> “मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
रामदास कदम किंवा प्रत्येकाच्याच घरात कलह असतो. मग तो सार्वजनिक करायचा का? हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. मागील ५६ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. ही आपली परंपरा आहे. या दिवशी शस्त्राचे पूजन होते. रावणाचे दहन होते. रावणाच्या रुपात आपण अहंकार जाळतो. जे सोडून गेले त्यांच्यात अहंकार आहे. सगळं काही मिळूनही त्यांनी वेगळा गट निर्माण केला, अशी टीकाही मनिषा कायंदे यांनी शिंदे गटावर केली.