शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.
आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनिषा कायंदे शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. या घडामोडींनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या मनिषा कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली.
याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मनिषा कायंदे या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.