ठाकरे गटाला रामराम ठोकत विधान परिषद सदस्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच या घडामोडी घडल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. मनिषा कायंदेंना लागलीच एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली. या पार्श्वभूमीवर राजकीय तर्क-वितर्क लावले जात असतानाच खुद्द मनिषा कायंदे यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. आपण अजूनही शिवसेनेतच असून पक्ष सोडलेला नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
मनिषा कायंदेंनी माध्यमांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “मी २०१२मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ती बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना होती. आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झालाय हे खरं आहे. एकनाथ शिंदेंकडे अधिकृत शिवसेना आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्षबदल केलेला नाही”, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.
“भाजपात असतानाही शिवसेनेचं काम केलं”
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी यावेळी मोठं विधान केलं. आपण भाजपात होतो, तेव्हाही शिवसेनेचंच काम केल्याचं त्या म्हणाल्या आहेत. “माझा राजकीय प्रवास खूप मोठा आहे. मी पूर्वी २५ वर्षं भाजपात काम केलं. सर्वात आधी मी मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केलं. नारायणराव आठवले मध्य दक्षिण विभागातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर मनोहर जोशी सर, विद्यमान खासदारांच्या दोन टर्म असा पूर्ण काळ होता. त्यामुळे मी जरी भाजपात होते, तरी निवडणुकीच्या वेळी मी सातत्याने शिवसेनेचंच काम केलं. शिवसेनेची व भाजपाची विचारधारा समसमानच होती. त्यामुळे भाजपातून शिवसेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली”, असं त्या म्हणाल्या.
“कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही”
यावेळी उद्धव ठाकरेंचं नाव घेत ‘कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही’, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. “उद्धव ठाकरेंची आम्ही भक्कम साथ दिली. आजही मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाहीये. महाविकास आघाडीतील विभिन्न विचारधारा न पटण्यासारख्या होत्या. पण शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशांचं आम्ही पालन करत होतो. जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना ही महाविकास आघाडी कधीच पसंत नव्हती. उद्धव ठाकरेंनी ज्यांना ज्यांना जवळ केलं, त्याचं समर्थन करणं कठीण जात होतं”, असंही मनिषा कायंदेंनी नमूद केलं.
“आमच्या देवी-देवतांची खिल्ली उडवणारे…”, आमदार मनिषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल, म्हणाल्या…
“काही गोष्टी पटत नव्हत्या. पण पक्षप्रमुखांची साथ सोडायची नाही हा विचार नेहमीच ह्रदयात होता. पण हिंदुत्वाची विचारधारा दिवसेंदिवस दूर जात आहे. ते न पटणारं होतं”, असंही त्या म्हणाल्या.
“ती माझी खंत होती”
“उद्धव ठाकरेंनी मला संभाजीनगरचं महिला संपर्क प्रमुख केलं. विदर्भातही दोन जिल्हे दिले. पण त्यानंतर एखादी ज्युनिअर व्यक्ती येऊन मला आदेश द्यायला लागते. हे बोलायचा मी प्रयत्न केला. पण माझं बोलणं गांभीर्याने घेतलं गेलं नाही. माझी ती खंत होती. पक्षकार्यकर्त्यांना मनमोकळेपणाने बोलता आलं पाहिजे”, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका केली.