शिवसेना पक्षाचा सध्या संघर्षाचा काळ सुरू आहे. साधारण एक वर्भभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात सामील झाले आहेत. एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे.रात्री उशिरा मनिषा कायंदे यांनी ठाण्यातल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. दरम्यान, रविवारी मनिषा कायंदे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनिषा कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिंदे गटात प्रवेश केला.

आमदार कायंदे यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरून शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मनिषा कायंदे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कांयदे यांच्याकडे व्यक्त केली.

हे ही वाचा >> “दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगाके…”, संजय राऊतांची टोलेबाजी!

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manisha kayande joins shiv sena shinde grup cm eknath shinde asc
Show comments