ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मनिषा कायंदेंवर टीकास्र सोडलं. ४० कोटींच्या कथित फाईलमुळे मनिषा कायंदे शिंदे गटात गेल्या, असं विधान संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानावर स्वत: मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मला कुठल्या निधीचं आमिष दिलं नाही. मी कुठल्याही आमिषाला बळी पडले नाही, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली. शिंदे गटाच प्रवेश केल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
मनिषा कायंदे पुढे म्हणाल्या, “काही लोकांना वाटतं, माझा आमदारकीचा कार्यकाल पुढच्या महिन्यात संपणार आहे. पण असं नाहीये, माझा अजून एक वर्षाचा कार्यकाल बाकी आहे. २०२४ ला निवडणुका होतील. त्यानंतर कुणाला काय मिळणार? हे ठरेल. राजकारणात खूप वचनं दिली जातात. पण त्या-त्या वेळी काय अडचणी असतात? हे आपल्याला माहीत आहे. मला संघटनेत फक्त एक चांगलं पद द्या, जेणेकरून मला मनमोकळेपणाने काम करता येईल, एवढंच मी एकनाथ शिंदेंना म्हटलं.”
हेही वाचा- मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मोठा निर्णय
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मनिषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केल्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “जे खरे शिवसैनिक आहेत, ते शिवसेनेतच आहेत. प्रत्येक गोष्ट खोके किंवा पैशांनी विकत घेता येत नाही. ४० कोटींची कुठलीतरी फाईल समोर आली म्हणून बाई (मनिषा कायंदे) शिंदे गटात गेल्या, असं मी काल व्यासपीठावर ऐकलं आहे. याबद्दल मला जास्त माहीत नाही. मी या विषयावर फार बोलतही नाही. पण हे लोक कुठून येतात आणि कुठे जातात? हा एक संशोधनाचा विषय आहे. यावर भविष्यात आम्हाला विचार करावा लागेल.”