विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला. रात्री उशिरा मनिषा कायंदे यांनी ठाण्यातल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केला. दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटातील प्रवेशावर मनिषा कायंदे म्हणाल्या, ठाकरे गटात महिला आघाडीची वर्षभरापासून घुसमट होत आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, ती मी सविस्तर केव्हातरी सांगेन. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा चालवणारी शिवसेना असू शकत नाही. आम्हाला वाटलेलं वर्षभरात यात बदल होईल, परंतु तसं काही झालं नाही.
प्राध्यापक मनिषा कायंदे म्हणाल्या, मला उद्धवजींनी आमदार केलं, विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. परंतु मला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा होती. मला त्याचा मोठा अनुभव आहे. परंतु तिथे मला त्यावर कधीच काम करता आलं नाही. मला संघटनेत जबाबदारी हवी होती. पण ती मिळत नव्हती.
मनिषा कायंदे म्हणाल्या, आमची ठाकरे गटात घुसमट होत होती. आमच्या देवी देवतांना ज्यांनी शिव्या घातल्या, त्यांची खिल्ली उडवली, ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? हा प्रश्न मला सतावत होता. काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्हतं. मी वयाच्या २५ व्या वर्षीपासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले तरी विचारांनी शिवसैनिक आहे. नुसतंच सकाळी उठून आपण एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, त्यापेक्षा सकारात्मक काम करायची माझी इच्छा होती.
हे ही वाचा >> शिंदे गटात प्रवेश करताच मनिषा कायंदे यांच्यावर मोठी जबाबदारी, खुद्द एकनाथ शिंदेंनी केली घोषणा!
आमदार कायंदे म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा काम करण्याचा स्वभाव आहे. मलाही जनतेचं काम करायचं आहे. ते करता यावं यासाठी योग्य व्यासपीठ हवं होतं, ते आता मिळालं आहे. तिथे आमची घुसमट होत होती.