|| प्रदीप नणंदकर

१५ टीएमसी पाणी वाया; इतर बंधाऱ्यांमध्ये साठवणुकीच्या मागणीकडे दुर्लक्ष

लातूर :  गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा, तेरणा या धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत असल्याने धरणातील पाणी नदीच्या पात्रात सोडल्याने पात्रालगतच्या आजूबाजूच्या शेतीत पाणी शिरल्याने नुकसान झाले. शिवाय १५ टीएमसी पाणी कर्नाटक व तेलंगणा प्रांतात वाहून गेले. पाच वर्षापूर्वी लातूर शहराला पाणीपुरवठा रेल्वेने करावा लागला होता. मांजरा धरण पूर्णपणे कोरडेठाक होते.आता पाऊस पडूनही त्याचा योग्य विनियोग केला गेला नाही त्यामुळे पडलेले पाणी वाहून गेले.

मांजरा धरणातील पाणीसाठा वाढू लागल्यानंतर निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी २० सप्टेंबर रोजीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असला तरी अनेक जलाशयांत पाणीसाठा नाही. नजीकच्या काळात मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मांजरा व तेरणा नदीवर बांधण्यात आलेल्या विविध बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जावे शिवाय जे जलाशय कोरडे आहेत तेथे कालव्याद्वारे पाणी नेऊन पाणी साठवले पाहिजे. मसलगा, साकोळ, व्हटी, घरणी आदी मध्यम प्रकल्पात व जिल्ह्यातील लघु पाटबंधारे तलावाच्या बाबतीत त्याचा अवलंब करण्याची सूचना केली होती. जलसंपदा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

धरण १०० टक्के भरल्यानंतर धरणाचे १८ दरवाजे उघडण्याची वेळ आली त्यामुळे नदीला पूर आला व मोठे नुकसान झाले व पाणी वाया गेले. या वाया गेलेल्या पाण्याबाबतीत चौकशी व्हायला हवी अशी मागणीही निलंगेकर यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा दौरा दोन दिवसांपूर्वी केला. त्यांनीही याला दुजोरा दिला आहे.

सिंचनक्षेत्रात वाढ नाही

अमेरिका, कॅनडा आदी देशांत धरणातील पाण्याचा सिंचनासाठी योग्य उपयोग व्हावा यासाठी धरणाच्या वरच्या बाजूला छोटे धरण बांधले जाते ज्यातून पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते. धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी आता नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज आहे. पाऊस चांगला पडला तरीही १८ ते २० टक्केपेक्षा अधिक सिंचनक्षेत्र वाढत नाही. जिल्ह्यातील सर्व जलाशयात पाणी साठवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये आपले ढिसाळ नियोजन असते. योग्य पाणीवापर संस्था कार्यरत नाहीत त्यामुळे अनेक अडचणी आहेत.

मांजरा धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदीवरील विविध बंधाऱ्यांत साठवून लातूर शहराच्या पाणीटंचाईच्या काळात ते पाणी शहरवासीयांना उपलब्ध व्हावे यासाठी चार टीएमसीच्या साठ्याची तरतूद करण्यात आली मात्र दुर्दैवाने या पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नाही. निलंगेकर यांनी प्रशासनावर केलेल्या गंभीर आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नियमानुसार पाण्याचा विसर्ग

लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे  कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी मांजरा धरणातील पाणी प्रारंभी कालव्याद्वारे सोडले. कालव्याची क्षमता कमी असल्याने जास्त पाणी सोडता आले नाही. १ ऑक्टोबरपूर्वी १०० टक्के धरण भरले नाहीतर ते पाणी धरणातून सोडता येत नाही त्यामुळे आवश्यकतेनुसार निर्णय घेत नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कमी मनुष्यबळ असताना आपण योग्य नियोजन केले असल्याचा दावाही त्यांनी केला.

नव्याने सूचना देण्याची गरज

धरणातील पाणीसाठा विसर्ग यासंबंधीचे नियम पूर्वी पडणाऱ्या पावसाच्या आधारावर करण्यात आले आहेत. साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत चांगला पाऊस पडतो. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाचा योग्य वापर व्हावा यासाठी पाण्याची तरतूद केली जाते त्यामुळे धरणाचे दरवाजे ऑक्टोबर महिन्यात उघडावेत तोपर्यंत धरणात १०० टक्के पाणी साठवून घ्यावे. धरणातील पाणी खाली सोडल्यास व पुन्हा पाऊस पडला नाहीतर अडचण होऊ नये यासाठीच्या या तरतुदी आहेत मात्र हवामान बदलामुळे पावसाची अनिश्चिातता आहे. कमी कालावधीत अधिक पाऊस पडतो. मोठा खंड पडतो. आता सप्टेंबर नाही तर डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडतो आहे त्यामुळे धरणातील पाण्याच्या विसर्गासंबंधी नव्याने निकष बदलायला हवेत. तारतम्याने संबंधित जिल्हाधिकारी व जलसंपदा  विभागाचे अधिकारी यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार देण्याची गरज आहे.

Story img Loader