देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे व्यापाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे लिलाव बुधवारपासून बंद असताना आता बाजार समितीतील माथाडी कामगारांना तोलाई व हमालीचे दर वाढवून मिळावेत यासाठी व्यापाऱ्यांबरोबर झालेली बोलणी फिसकटल्याने मनमाड येथील लिलाव बेमुदत बंद करण्यात आले आहेत.
नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मनमाड बाजार समितीतील कार्यरत व्यापारी व आडत्यांनी हमाली, तोलाई करणाऱ्या १३६ कर्मचाऱ्यांना दर वाढवून द्यावेत अशी मागणी माथाडी संघटनेतर्फे बाजार समिती प्रशासनाकडे करण्यात आली. गुरूवारी किरकोळ आवकनंतर दुपारी कर्मचाऱ्यांनी लिलाव पुकारला. संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी बाहेरगावहून आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोय होऊ नये म्हणून या लिलावास संमती दिली. त्यानंतर पुन्हा बंद पुकारला. लिलाव ढप्प झाल्याने बाजार समिती कार्यालयात व्यापारी कामगारांचे प्रतिनिधी व बाजार समिती प्रशासन यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली. दोन तास चर्चा होऊनही कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले व त्यांनी बाजार समिती आवारात एकच गोंधळ घालून घोषणाबाजी व निदर्शने केली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला पण कामगार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते त्यामुळे त्यांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला असून शुक्रवारपासून कोणतेही लिलाव होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.