मनमाड नगराध्यक्षपदासाठी निश्चित झालेल्या आवर्तनाप्रमाणे या पदावरील कार्यकाळ पूर्ण होताच नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकारी नीलेश जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. सुमारे वर्षभराच्या कार्यकाळात शहराच्या विकासात योगदान देता आल्याचे पगारे यांनी सांगितले. नव्या नगराध्यक्षाची निवड लवकरच केली जाणार आहे.
नगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या शहर विकास आघाडीकडे सत्ता आहे. सत्ता सर्वसमावेशक असावी तसेच विकास कामात जास्तीतजास्त लोकप्रतिनिधींना पदे भूषविण्याची संधी मिळावी या उद्देशाने प्रत्येक गटाला साधारणत: वर्षभरासाठी संधी दिली जाते. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०१२ मध्ये राजेंद्र पगारे यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर आपण स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी सत्तारूढ आघाडीचे साईनाथ गिडगे, प्रमोद पाचोरकर, सचिन दराडे, बबलू पाटील, बब्बू कुरैशी आदी उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात पावसाने कायमच ओढ दिली. त्यामुळे मागील दोन वर्षे वाघदर्डी बंधारा भरू शकला नाही. शहराला पाटोदा तालुक्यातून पालखेडच्या आवर्तनावर पाणीपुरवठा होत आहे. या तलावाची साठवण क्षमता तिपटीने वाढविण्यात यश आले असून त्याची खोदाई पूर्णत्वास गेल्याचे पगारे यांनी सांगितले. त्यामुळे पाऊस नसतानाही सध्या मनमाडला १५ दिवसाने पाणीपुरवठा करता येतो, असे ते म्हणाले. नवा नगराध्यक्ष पुढील आठ ते दहा दिवसांत निवडला जाणार असून त्यासाठीची तारीख एक ते दोन दिवसांत निश्चित केली जाईल. काँग्रेसने या वेळी आपल्या गटाला नगराध्यक्ष पद मिळावे यासाठी आग्रह धरल्याने राजकीय हालचाली पुन्हा गतिमान झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा