एकटय़ा मुंबईत मोठय़ा संख्येने व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. पण, दुर्देवाची बाब म्हणजे त्यात मराठी माणसांचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. उर्वरित ९० टक्के बाहेरील मंडळी व्यवसाय करत असून त्यांचे आपणास कौतुक वाटते, अशा शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मराठी माणसाच्या नोकरीच्या मागे धावण्याच्या मानसिकतेवर बोट ठेवले. चांदोरी येथील क. का. वाघ महाविद्यालयातर्फे मंगळवारी जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बनावे, अशी भावना व्यक्त केली.
महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ‘मराठी तरूण आणि उद्योग व्यवसाय’ या विषयावर लेखक नंदन रहाणे यांनी त्यांची मुलाखत घेतली. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय काय आवश्यक असते, याची पंचसूत्री जोशी यांनी मांडली. मराठी माणूस मोठी स्वप्न पहात नाही. नोकरी करण्याची बहुतेकांची मानसिकता असते. उद्योग व व्यवसायाचा फारसा विचारही केला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये उद्योग व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. व्यवसायाच्या माध्यमातून श्रीमंत होता येते. यामुळे मराठी माणसाने त्याचा विचार करणे आवश्यक आहे. मराठी माणसाने मोठी स्वप्न पाहून श्रीमंत व्हावे, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. मुलाखतीचा विषय वेगळा असल्याने मुलाखतकर्त्यांने राजकीय स्वरुपाचे प्रश्न विचारले नाहीत. यावेळी क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader