चीनसोबतचा सीमावादाचा प्रश्न असो की, भारत-चीनचे संबंध सुधारण्याचा विषय असो, हा एक-दोन दिवसांत सुटणारा प्रश्न नाही. त्याला वेळ लागणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनचा दौरा ही त्याची सुरुवात असल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाडय़ावर मनोहर पर्रिकर यांनी भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनचा दौरा हा दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचा आणि सीमावादाचा प्रश्न सोडविण्यासाठी असला तरी त्याला वेळ लागेल. त्या दृष्टीने मोदी यांची चीनमध्ये बोलणी सुरू झालेली ही सुरुवात आहे. भविष्यात दोन्ही देशांतील संबंध चांगले होऊन देशाच्या विकासासाठी ते सहाय्यभूत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते नागपूरला सरसंघचालकांची भेट घेत आहे त्याबाबत विचारले असता पर्रिकर म्हणाले, सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी काही विषय असलाच पाहिजे, असे नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांची भेट व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. जे स्वयंसेवक आहेत ते सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी येतच असतात. त्यामुळे नेत्यांच्या भेटीमागे असे कुठलेही कारण नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, नागपुरात तृतीय संघ शिक्षा वर्ग सुरू आहे, पण तेथेही जाणे शक्य नाही.
शहराच्या विकासासंदर्भातील अनेक प्रकल्प संरक्षण विभागाच्या अडसरामुळे रखडले होते. त्या संदर्भात राज्य शासन आणि महापालिकेने पत्रव्यवहार केलेला आहे. विशेषत: टेकडी मार्गावरील जागा संरक्षण विभागाकडे आहे. शिवाय सीताबर्डी किल्ल्याचा विकास करण्याचा दृष्टीने विचार सुरू आहे. ऑर्डनन्स विभागाची माहिती घेण्याच्या दृष्टीनेही अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.
‘देश शस्त्रसज्ज’
कॅगच्या २०१३ च्या अहवालानुसार भारताकडे पुरेशी यंत्रसामग्री नसल्याचे विचारल्यावर ते म्हणाले, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. तो अहवाल आता जुना झाला असून भारताजवळ सध्या युद्धविषयक मुबलक सामग्री असल्यामुळे त्या अहवालाचा विचार करीत नाही.