राजकारणात जायचं नाही म्हणून मी उपोषणाला बसलो असून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी आहे. त्यानंतर त्यांना आरक्षणाच्या विषयावर तोंडही उघडता येणार नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच राज्यात मराठ्यांवर अन्याय सुरू असून सरकारकडून हे सगळं ठरवून हे केलं जातं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच त्यांनी वडीगोद्री येथे झालेल्या मराठा-ओबीसी संघर्षाबाबतही प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

“राज्यात मराठ्यांवर अन्याय सुरू आहे. सरकारकडून ठरवून हे सगळं केलं जातं आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. मी फक्त राजकारण ज्यायचं नाही म्हणून उपोषणाला बसलो आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची देवेंद्र फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे. त्यानंतर त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंड उघडता येणार नाही. आरक्षण मिळालं नाही, तर त्यांना देवेंद्र फडणवीस दोषी असतील, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच एक दोन दिवसांत आरक्षणाचा निर्णय होईल”, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

वडीगोद्री येथील ओबीसी-मराठा संघर्षावरही केलं भाष्य

पुढे बोलताना त्यांनी काल वडीगोद्री येथे झालेल्या ओबीसी-मराठा संघर्षावरही भाष्य केलं. “मी मराठ्यांना शांत राहण्याचे आवाहन करतो आहे. पण या वादाला तुम्ही ओबीसी-मराठा असं नाव देऊ नका. ओबीसी आणि मराठा कधीच एकमेकांच्या अंगावर जात नाही. हे काही लोकांनी जाणीवपूर्वक केलेलं नाटक आहे. त्यांना ओबीसीसाठी लढायचं नाही. हे लोकं फक्त भाडणं करण्यासाठी लढत आहेत”, अप्रत्यक्ष टीका त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली.

“…तर छगन भुजबळसारखा नेत्यांनी थयथयाट केला असता”

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणामुळे वडीगोद्रीतून आतरवाली सराटीकडे जाणारा रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली. “मराठे जातीयवादी आहेत, असं आरोप अनेकदा आमच्यावर केला जातो. मात्र, वडीगोद्री येतील आंदोलनामुळे आंतरवाली सराटीत येणारे रस्ते सरकारने बंद केले आहेत. मराठ्यांना दुसऱ्या रस्त्यावरून जाण्यास सांगितलं जात आहे. पण हेच आम्ही केलं असतं तर ओसीबींना वाडीत टाकलं, अशी टीका आमच्यावर करण्यात आली असती. छगन भुजबळसारखे नेत्यांनी थयथयाट केला असता. मात्र, आता यावर कोणीही बोलत नाही. हाच मुळात मराठ्यांवर अन्याय आहे. ज्याप्रमाणे आधी दलितांचे शोषण होत होतं. तसं आता मराठ्यांचे होते आहे”, असे ते म्हणाले.