मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, गुरुवारी (२१ डिसेंबर) कॅबिनेटमंत्री गिरीश महाजनांसह इतर काही नेत्यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि मुदत वाढवून देण्याची मागणी केली. पण मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
सरकारने आता तरी भानावर यावं, पुन्हा एकदा लाठीमार करण्याचा प्रयोग करू नये. अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. आता आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ते परभणी जिल्ह्याच्या सेलू येथील जाहीरसभेत बोलत होते.
अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारीचा उल्लेख करत मनोज जरांगे म्हणाले, “लोकांची डोकी फुटली, हात मोडले आणि पायही मोडले. कुणाच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. याच मराठ्यांच्या पोरांनी स्वत:च्या छातीची ढाल करून गोळ्या झेलल्या. त्या पोरांची काय चूक होती. एका नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात आरपार गोळी घुसली. त्या लेकराच्या पायातून दीड लिटरपेक्षाही जास्त पाणी निघालं आणि त्याचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले. सरकारने आता तरी भानावर यावं. दोन दिवसांत पुन्हा असाच प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं कठीण होईल. आम्ही मागे हटणार नाही.”
हेही वाचा- “जितेंद्र आव्हाड भांबावलाय, पागल झालाय”, एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका
“आम्ही काय चूक केली? कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. १९६७ पासूनचे पुरावे सापडले आहेत. जेव्हा आरक्षणच अस्तित्वात नव्हतं, त्याआधीपासून मराठा समाज आरक्षणात आहे. मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही? कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाहीये. सगळ्यात अगोदर मराठा समाज आरक्षणात आहे, तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही,” असंही जरांगे यांनी नमूद केलं.