मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपोषणही केलं. मात्र शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. मागच्या साधारण वर्षभरापासून मनोज जरांगे यांनी लढा उभा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे संघर्ष करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत उपोषण आंदोलनही तीन ते चारवेळा केलं आहे. आंतरवली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्या घटनेनंतर मनोज जरांगे चर्चेत आले. इतकंच नाही तर भुजबळ आणि त्यांच्यातलं वैरही सर्वश्रुत आहे.

भुजबळ आणि जरांगे यांच्यात टोकाचा संघर्ष

मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते वेगळं द्यावं. ते आरक्षण ओबीसी आरक्षणातून देऊ नये असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यासाठी ओबीसी मेळावेही घेतले. या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही रंगल्या होत्या. अशात आता बच्चू कडूंनी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं असं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे असंही वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे. या दोघांनीही एकमेकांवर कडाडून टीका केली होती. प्रसंगी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे झाले आहेत का? असाही सवाल केला होता. या दोघांचा टोकाचा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. अशात बच्चू कडू यांनी या दोघांना एक व्हा असं आवाहन केलं आहे. तसंच लवकरच आपण मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांंची भेट घेणार आहे असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?

बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

कुणबी, ओबीसी वाद मिटला पाहिजे. महाराष्ट्र पुन्हा शांत झाला पाहिजे. मराठवाड्यातला जो मराठा आहे तो कुणबी आहेच. कोकणातले मराठ्यांनी हात वर केले आहेत. त्यांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मागितलं आहे. जो मराठा समाज आहे तो कुणबीमध्ये म्हणजेच ओबीसीत समावेश झाल्यानंतर इतर ओबीसींमध्ये भय निर्माण झालं आहे हे सत्य आहे. ही भीती काढून टाकण्यासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंनी एकत्र यावं आणि दिल्लीसमोर लढा द्यावा. मी यासाठी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे या दोघांचीही भेट घेणार आहे. असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंचं आवाहन ऐकणार का?

महाराष्ट्र शांत रहावा यासाठी बच्चू कडू यांनी हे आवाहन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही केलं आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे बच्चू कडूंची भेट झाल्यानंतर काय भूमिका घेणार? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.