भाजपा आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच तुमची स्क्रिप्ट कुठून लिहून येते आहे? असा प्रश्न विचारत जरांगेंच्या हेतूंवरच शंका घेतली. यानंतर मनोज जरांगे यांनी नितेश राणेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले, “आता नितेश राणेंनी बोलू नये अशी माझी इच्छा आहे. एकिकडे ते मला फोन करून गोडगोड बोलतात आणि दुसरीकडे असं बोलतात. यापुढे मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही. त्यामुळे त्यांनी यापुढे बोलू नये.”
नितेश राणे काय म्हणाले होते?
नितेश राणे म्हणाले होते, “पहिल्या दिवसापासून शांततेची भाषा करणारे मनोज जरांगे पाटील राजकीय बोलू लागले आहेत. ज्या समाजकंटकांनी आंदोलनाला बदनाम केलं, लोकांची व आमदारांची घरं पेटवली, तोडफोड केली, कायदा सुव्यवस्था हातात घेतली त्याविरुद्ध उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्याला समर्थन करण्याऐवजी जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केली.”
हेही वाचा : “माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर राजकीय नेत्यांना घरात घुसून…”; मनोज जरांगेंच्या मुलीचं वक्तव्य
“याचा अर्थ जरांगे पाटील या हिंसेचं समर्थन करतात का? त्यांची स्क्रिप्ट कुठून तरी लिहून येतेय. असं होत असेल, तर राज्य सरकार म्हणून आणि मराठा समाज म्हणून याबद्दल आम्हाला विचार करावाच लागेल. एवढंच मी जरांगे पाटलांना सांगेन,” असं म्हणत नितेश राणेंनी मनोज जरांगेंवर टीका केली. तसेच माझी किती किंमत आहे हे भाजपाच्या लोकांना माहिती आहे, असंही नमूद केलं.