Manoj Jarange : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी उडी घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे खंडणी प्रकरणातील गुन्हेगार नाहीत याची मला १०० टक्के खात्री आहे. असं नामदेवशास्त्री म्हणाले होते. त्यावर आता मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली आहे. स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

नामदेव शास्त्रींनी काय म्हटलं होतं?

जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, त्यांची मानसिकता का नाही दाखवली, त्यांनाही अगोदर मारहाण झाली होती, ते सुद्धा दखल घेण्याजोगं आहे असं नामदेव शास्त्री म्हणाले. तो गावातला विषय होता, पण त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडला असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, आम्ही त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत असं नामदेव शास्त्री म्हणाले. महंत नामदेव शास्त्री म्हणाले, मी त्याला त्याला म्हणालो तू वारकरी सांप्रदायामध्ये असता तर एवढा त्रास सहन केल्यानंतर मोठा संत झाला असता. कारण धनंजय मुंडे यांनी घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलं आहे. गेल्या ५३ दिवसांपासून त्याची मानसिक अवस्था खालावली. त्यांच्या हाताला आता सलाईन लावलेलं आहे. असं राजकारण चांगलं नाही, त्याचा फार काळ फायदा होईल असं वाटत नसल्याचं महंत नामदेव शास्त्री म्हणाले आहेत. ज्यावरुन आता वैभवी देशमुखने नामदेवशास्त्रींना प्रश्न विचारला आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

महंत नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगड या ठिकाणी निघाले आहेत. याबाबत मनोज जरांगेंना विचारलं असता ते म्हणाले, हा देशमुख कुटुंबाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुटुंबांनं जावं. महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले. नामदेव शास्त्री आरोपींचं समर्थन करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल. पण ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे तिथेही जातीयवाद होऊ शकतो, याचा नवीन अंक पाहायला मिळत आहे असं मनोज जरंगे म्हणाले आहेत.

स्वतःची चूक झाकण्यासाठी…

मनोज जरांगे नामदेव शास्त्रींना उद्देशून म्हणाले, “आम्ही तुमचा सन्मान करतो पण आपण आपलं बघावं दुसऱ्यांकडे डोकावून पाहू नका .स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे. जातीय सलोखा बिघडवायला नको होता. पण धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे या सगळ्याचा चौथा अंक पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले. जातीयवादाचा हा अंक खरंच भयंकर आहे असंही मनोज जरांगे म्हणाले.

Story img Loader