जालना : मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आमच्याकडे आहेत. सरकारने येथे येऊन ती घेऊन जावीत आणि सध्या विधिमंडळ अधिवेशन नसल्याने त्या संदर्भात वटहुकूम काढावा, असे आवाहन जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सायंकाळी केले.
बुधवारी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस होता. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले होते. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जरांगे म्हणाले, आम्ही शासन आदेशासाठी चार दिवसांची मुदत दिली होती. आता शासनाने परत मुदत मागण्यापेक्षा येथे येऊन आरक्षणासाठी आवश्यक असलेले पुरावे घेऊन जावेत. समितीने काम केले नाही म्हणून या संदर्भातील पुरावे आमच्याकडेच आहेत. पुरावे देण्यास आणि त्या संदर्भातील तज्ज्ञ सरकारकडे पाठविण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही स्वत:हून पुरावे घेऊन जाण्याचे निमंत्रण सरकारला देत आहोत. सरकारला जी कागदपत्रे जमा करण्यास महिने लागणार आहेत, ती आताच आमच्याकडे आहेत, असेही जरांगे म्हणाले.