मनोज जरांगेंनी आंतरवली सराटीमध्ये बोलवलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मतं फुटतील. एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
“मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणार होता. ते अडचणीचं झालं असतं. मराठा समाजाला त्यांची शक्ति दाखवायची असेल तर उमेदवारही तुम्हीच द्या. फॉर्मही तुम्हीच ठरवा. पुढचा निर्णय ३० तारखेला जाहीर करु. मी राजकारणात उतरणार नाही. कारण तो माझा मार्ग नाही. कुणाच्या पक्षाला निवडा किंवा भाजपाला पाडा हे काही मान्य नाही. राजकीय शक्ती दाखवायची असेल तर मतांमध्ये रुपांतर करायचं असेल तर हजार आणि दहा हजार फॉर्म भरु नका. एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा म्हणजे ताकद दिसेल. मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा राहणार नाही. पण मराठा व्होट बँक काय आहे ती ताकद दाखवून देणार” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
जास्त फॉर्म भरु नका
“लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकतं. जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपली मतंही फुटतील. त्यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहे, आपल्याला त्यांचा काही फायदा होत नाही. आपलं आरक्षण दिल्लीत नाहीच”, असेही जरांगे म्हणाले आहेत.
हे पण वाचा- मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”
जिल्ह्यातून एकच अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा
मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. त्यामुळे तुमचा जर सर्वांचं मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वांना मान्य आहे का? याची चर्चा करावी. त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, राजकारण माझा मार्ग नसून, मला त्यात अडकवू नका असेही जरांगे म्हणाले आहेत.
दुसरा पर्याय देखील सांगितला…
दुसरा पर्याय असा आहे की, कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून लेखी लिहून घ्या की त्याचा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा राहील. पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याने जरांगे यांनी हा पर्याय सोडून द्या असे स्पष्ट केलं
मराठा समाजाचे १७ ते १८ मतदारसंघावर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लीम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉण्ड लिहून घ्यायचा तू सग्या सोयऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का..? हा पश्न त्या उमेदवाराला विचारला गेलाच पाहिजे असंही जरांगे म्हणाले.