मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या टीकेवर सडकून टीका केली. “ते दोन येडपट आमच्या मागे लावले आहेत. आमच्या मराठ्यांचे दोनच पारं त्यांना बेजार करतील,” असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला.
मनोज जरांगे म्हणाले, “सध्या मराठा समाजाला भडकावण्याचा आणि हिंसा घडवून आणण्याचा डाव आखला जात आहे. असं झालं तर तुम्ही धिंगाणा घातला म्हणून आम्ही आरक्षण दिलं नाही म्हणतील. बेट्याहो हे मराठे आहेत, सगळ्यांच्या पुढे आहेत, तुम्ही येडे आहात का. आमच्या नादी लागणं इतकं सोपं समजू नका. तुम्ही आमच्या नादी लागायला कोणत्या झाडाचा पाला आहात.”
“खाली कमेंटमधील शिव्या वाचूच वाटत नाहीत”
“ते दोन येडपट आमच्या मागे लावले आहेत, पण आमच्या मराठ्यांची दोनच पोरं त्यांना बेजार करतील. खाली कमेंटमधील शिव्या वाचूच वाटत नाहीत. त्या शिव्या वाचल्या तर दोन दिवस भाकर खाल्ली जात नाही. ते कसे भाकर खात असतील त्यांचं त्यांना माहिती. त्यांना त्याची सवय आहे की काय त्यांचं त्यांना माहिती,” असं म्हणत मनोज जरांगेंनी टोला लगावला.
“मराठा पायाखाली मुंगीही मरू देत नाही”
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मराठ्यांनी त्यांना मोठं केलं, त्यांची शान वाढवली. आपलं ठरलं आहे की, ४० दिवस काहीच बोलायचं नाही. आपण शांततेत कार्यक्रम करायचं ठरलं आहे. मराठ्यांनी शब्द दिला. मराठ्यांनी देशाला आणि जगाला भयानक संदेश दिला आहे. कोट्यावधीच्या संख्येने जमलेला मराठा पायाखाली मुंगीही मरू देत नाही.”
हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी अन्यथा..”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
“मराठ्यांनी मला दिलेला शब्द पाळला”
“लोक म्हणत होते की, जमलेली गर्दी माघारी पाठवणं खूप अवघड आहे. मात्र, मराठ्यांनी मला दिलेला शब्द पाळला. मी त्यांच्या चरणी नतमस्तक आहे,” असंही जरांगेंनी नमूद केलं.