मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. २५ ऑक्टोबरपासून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांची प्रकृती बिघडताना दिसत आहे. त्यांच्या अशा कठोर उपोषणामुळे मराठा समाजासह त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. पण मनोज जरांगेकडून समाजासाठी जो लढा दिला जातोय, याला कुटुंबाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मनोज जरांगेंचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी जरांगेही चर्चेत आली आहे. तिचाही आपल्या वडिलांच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा आहे. यामुळे पल्लवीच्या मैत्रिणींकडून तिची तुलना भाजपा नेत्या पंकजा मुंडेंशी केली जात आहे. याबाबतचा एक किस्सा स्वत: पल्लवीनं सांगितला आहे. तसेच वेळ पडली तर मीही वडिलांसारखं समाजकारणात जाईल, असा मानसही तिने बोलून दाखवला आहे. ती ‘एबीपी माझा’शी बोलत होती.
यावेळी पल्लवी जरांगे म्हणाली, “माझ्या मैत्रिणी म्हणतात तू पंकजा मुंडेंसारखी आहेस, कारण पंकजा मुंडेंनी जसा त्यांच्या वडिलांचा राजकारणाचा वारसा पुढे चालवला, तसं तूही तुझ्या वडिलांचा वारसा चालवशील. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, पंकजा मुंडेंचे वडील राजकारणात होते आणि माझे वडील समाजकारणात आहेत. वेळ पडली तर मीही समाजकारणात जाईल. माझ्या पप्पांसाठी मी तेही करेन. पण माझे पप्पा (मनोज जरांगे) म्हणतात की, मी समाजासाठी लढायला तयार आहे, तुम्ही फक्त शिका आणि स्वत:च्या पायावर उभं राहा.”