Manoj Jarange Patil Hunger Strike Updates : मराठा समाजासाठी उपोषण आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. मनोज जरांगे मागच्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज त्यांनी उपोषण स्थगित केलं असल्याची घोषणा केली आहे.देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला कुणबी मराठा एकच आहे. समाज एक झाला हे चांगलं झालं आहे. मराठा आणि ओबीसी एकच आहेत. आपल्या आरक्षणाची लढाई पुढे चालली आहे. आपण कुठल्याही नेत्याला भ्यायचं नाही हे लक्षात घ्या. आमच्या लेकरांशी, लेकींशी बेइमानी करु नका. तसंच तुम्हाला सांगतो एकाही नेत्याच्या सभेला, प्रचाराला जायचं नाही, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
ज्यांनी त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार
खुशाल घरी झोपून राहायचं, लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही दिले तरी चालतील कुणीही प्रचाराला जायचं नाही. राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकमेकांना साथ द्या. त्यापेक्षा जास्त त्रास दिला तर व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कुणीच नाही हे लोकसभेला झालं आहे तसंच आत्ताही करा असंही मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित झाल्याची घोषणा करताच एक मराठा लाख मराठाच्या घोषणा करण्यात आल्या. मराठा आरक्षणासाठीची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाने मला खूप आग्रह केला. त्यांनी उपोषण करायचं नाही असं सांगितलं. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार आहेत. मी आज ४ किंवा ५ वाजता उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगेंनी जाहीर केलं.
हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीसांना ही शेवटची संधी, त्यानंतर…”; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!
मी ४ ते ५ च्या दरम्यान उपोषण सोडणार
मला आरामाची गरज आहे, तुम्ही आलात की उठून उभं रहावं लागतं, बसावं लागतं. मागच्या वर्षभरात मी हे कधीही म्हटलं नव्हतं. पण आज मी सगळ्या लोकांना भेटतो. त्यानंतर मी उपोषण सोडेन असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. नांदेड, हिंगोली, परभणीतून लोक आले आहेत. आज जे लोक आले आहेत त्यांनी जेवणं करुन घ्या. ४ ते ५ च्या दरम्यान मी माझं उपोषण सोडतो. मी आज महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सांगतो आहे, आता नंतर येऊ नका. जे रस्त्यात आहेत त्यांच्यासाठी मी थांबतो आहे. माता माऊली आणि माझे बांधव यांनी मला विनंती केली. सलाइन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी उपोषणाला जे बसले आहेत त्यांनीही उपोषण सोडा असंही मी तुम्हाला आज सांगतो आहे असंही मनोज जरांगे म्हणाले.