मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करायला सुरुवात केली आहे. त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला असून वैद्यकीय सेवाही नाकारल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांच्या कुटुंबासह मराठा समाजाची चिंता वाढताना दिसत आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने कुटुंबाची घालमेल वाढली आहे का? असा सवाल विचारला असता पल्लवी म्हणाली, “होय, आमच्या कुटुंबाची खूप घालमेल वाढली आहे. कारण पप्पांनी उपोषण करावं, अशी त्यांची अवस्था नाहीये. मागच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्यांनी उपोषण करू नये, पण सरकारला उपोषणाशिवाय जागच येत नाही. त्यामुळे दु:ख होतंय आणि पप्पांना असं उपोषण करावं लागतंय.”
हेही वाचा- “अजित पवारांचा निर्णय योग्यच, त्यांनी संघर्ष…”, ‘त्या’ निर्णयावर शरद पवारांचं मोठं भाष्य
“आज पप्पांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खराब झाली आहे. त्यामुळे मम्मी सतत रडत आहे आणि आजोबाही बेचैन झाले आहेत,” अशी प्रतिक्रिया पल्लवी जरांगेनं दिली आहे. माझ्या पप्पांनी उपोषण करू नये, असं मला वाटतं पण ते समाजासाठी जे काही करतायत, ते चांगलं आहे, असंही पल्लवी म्हणाली. ती ‘एबीपी माझा’शी बोलत होती.
हेही वाचा- “गड्यांनो मला माफ करा, मी…”; क्षीण आवाजात मनोज जरांगे यांचं वक्तव्य, म्हणाले…
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मराठ्यांच्या लेकरांसाठी गड्यांनो मला माफ करा. मी पाणी उपचार घेऊ शकत नाही. कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा,” अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.