मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील मागील काही महिन्यांपासून लढा देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं. आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भात मुदत दिली आहे. सगेसोयऱ्यांसह आरक्षण मिळण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. राज्य सरकारने १३ जुलैपर्यंतची दिलेली तारीख आता जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध भागात शांतता रॅली सुरु केली आहे.
मनोज जरांगे यांनी या रॅलीची सुरुवात हिंगोलीमधून केली. आज ही रॅली लातूर जिल्ह्यात होती. दरम्यान, १३ जुलैपर्यंत ही रॅली चालणार असून त्यानंतर मनोज जरांगे पुढची भूमिका स्पष्ट करणार आहेत. आज मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे. आगामी विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्या अनुषंगाने बोलताना मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना म्हटलं की, “तुमच्या एक लक्षात नाही. जामनेर विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
हेही वाचा : “अजित पवारांचा धाक कमी झाला, आता सूचना दिल्या तरी…”, नाना पटोलेंचा खोचक टोला
मनोज जरांगे काय म्हणाले?
“मंत्री गिरीश महाजन तुम्ही कितीही डाव टाका. मी देखील आरक्षणातील बाप आहे आणि जातवान क्षत्रिय मराठा आहे. तुम्हाला तीन-चार वेळा मंत्रीपद काय मिळालं तर तुम्ही उड्या मरायला लागले. तुमच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा घुसली आहे. मात्र, तुमच्या एक लक्षात नाही. जामनेर विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्याही धुऱ्या वर करू शकतो”, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना दिला.
धनंजय मुंडेंवर केला ‘हा’ आरोप
मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्येही निघणार आहे. मात्र, या रॅलीला परवानगी देण्यात आली नाही, यावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. मनोज जरांगे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगून तेथील रॅलीची परवानगी रद्द केली. मात्र, मी सांगतो की, बीडची रॅली शांततेत पार पडणार. पण बीडच्या पालकमंत्र्यांना असा पद्धतीचा जातीवाद शोभत नाही”, असा आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.