Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, अपहरण झाल्याच्या काही तासानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला. तसेच माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल, असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“काहीतरी खंडणीच्या प्रकरणातून हा सर्व प्रकार घडल्याचा अंदाज आहे. मात्र, एक होतकरू मुलगा आज आमच्यामध्ये नाही. एक चांगला मुलगा आमच्यात नाही. माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे म्हणता ना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा. लोकांना चांगले धडे दिले पाहिजेत. जर अशा प्रकारे खून व्हायला लागले आणि दहशत व्हायला लागली तर समाजाला ना विलाजाने उठावं लागेल”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“माझे लोक मरायला लागलेत आणि तुम्ही आरोपींना मोकाट फिरु देता. मात्र, असं असेल तर जड जाईल. मग तुम्हाला जे वाटतं त्याच्या पलिकडे ही प्रक्रिया जाईल. आरोपींवर कारवाई झाली पाहिजे, त्या आरोपींना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे. अशा प्रकरणामध्ये जात आणली नाही पाहिजे”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.