Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण, आंदोलनंही केलं. मात्र, अद्याप मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच मनोज जरांगे यांनी केलेल्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यामुळे सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीच्या सरकारला पु्न्हा एकदा इशारा देत सूचक विधान केलं. “आरक्षण घेण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, आता सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही”, असं सूचक विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे काय म्हणाले?

“सर्वच पक्षांच्या मराठा समाजाच्या आमदारांनी त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. आमचं हक्काचं ओबीसीमधून आरक्षण आम्हाला द्या. कारण आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सध्या सत्तेत ते आहेत. ते जर देणार नसतील तर आमच्यासमोर आरक्षण घेण्यासाठी दुसरा पर्याय काय? आता आमच्यापुढे एकच पर्याय, सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरीबांना देणारं बनल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की, तुम्ही राजकारणात गेला आहात. एवढ्या वेळेस सत्तेत जायची संधी आहे. राजकारण्यांना पायाखाली तुडवायची ही योग्य वेळ आहे”, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

हेही वाचा : Anandrao Adsul : “१० दिवसांत मला राज्यपाल केलं नाही तर…”, शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा; महायुतीत जुंपली?

“गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालेलं नाही तर ढवळून काढलं आहे. सरकारने सत्तेचा गैरवापर केला आणि मराठ्यांच्या अंगावर ओबीसींचे नेते घातले. अशा प्रकारची सत्ता कधीही याआधी लोकांनी पाहिली नव्हती”, असा हल्लाबोलही मनोज जरांगे यांनी केला.

“मला मराठा समाजाविरोधात बोललं की सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून मला टार्गेट करायचं ठरवलं. त्यांना माहिती आहे की समाजाच्या प्रश्नांसाठी हा ताकदीने लढतो. याला तेथून बाजूला करायचं. त्यामुळे हे सर्व एकत्र आले आहेत. माझ्या विरुद्ध सर्वांनी षडयंत्र रचलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशा पाच ते सहा टोळ्या उभ्या केल्या आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंची शांतता रॅली

मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे यांनी आता शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. सोलापूरमधून ७ ऑगस्टपासून शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या रॅलीची सांगता नाशिकमध्ये होणार आहे. ही रॅली पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यामधून जाणार आहे. याआधी मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात शांतता रॅली काढली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange on maratha reservation and maharashtra politics assembly elections 2024 gkt