गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यात विविध ठिकाणी जाहीरसभा घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्याव, अन्यथा तीव्र उपोषण केलं जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील रुपरेषा काय असेल? याचीही घोषणा केली आहे.
“मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केलं जाणार आहे. त्या उपोषणादरम्यान, कुठलेही औषधोपचार किंवा वैद्यकीय सेवा घेतली जाणार नाही. अन्न आणि पाण्याचाही त्याग केला जाईल. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून २५ तारखेपासून एकदम कठोर उपोषण केलं जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावचा सीमाही तुम्हाला शिवू देणार नाही” असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत”; रोहित पवारांचं स्पष्ट विधान, म्हणाले, “त्यांनी माफी…”
“प्रत्येक सर्कलमधील सर्व गावाच्या वतीने एकाच ठिकाणी महाराष्ट्रभर ताकदीने साखळी उपोषण सुरू केलं जाणार आहे. २८ तारखेपासून या साखळी उपोषणाचं आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सगळ्या गावांनी सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठं गाव असेल तर त्याठिकाणी आसपासच्या गावातील सर्व लोकांनी एकत्र येत कायमस्वरुपी बसून राहायचं आहे,” अशा सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा- “मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “प्रत्येक तालुक्यात आणि गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजाने एकत्र येत सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचा आहे. हे शांततेचं सुरू झालेलं आंदोलन सरकारला झेपणार नाही. २५ ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाची नवी दिशा सांगणार आहे. मात्र सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. हे आमरण उपोषण आणि सर्कलचे साखळी उपोषण महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे चालवणार आहेत. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न २४ तारखेच्या आत मार्गी लावावा. २५ तारखेला पुन्हा आंदोलनाची दिशा सांगितली जाणार आहे. ती तुम्हाला पेलणारी नसेल. हे आंदोलन तुमच्यासाठी सोपं आहे, असं वाटेल पण हे आंदोलन सुरू झाल्यावर तुम्हाला झेपणार नाही.”