Manoj Jarange : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडवर मोकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडला आज बीड न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीवेळ न्यायालयाच्या बाहेर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग आहेत, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही हे सहन करणार नाहीत’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“संतोष देशमुख यांच्याबाबत आरोपींना काहीही दया आली नाही, आरोपींनी मजा घेतली. तसेच खंडणीतील आरोपीने वाचण्यासाठी सरकारमधील मंत्र्याला फोन केला असेल. खंडणीतील आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले? कोण कोणाला भेटलं? हे सर्व चार्जशीट मध्ये यायला पाहिजे. सरकारने आता म्हणू नये की आम्हाला हे आढळून आलं नाही, आणि ते आढळून आलं नाही. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. ही सर्व जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. परळीला लागलेला हा डाग आणि धनंजय मुंडेंची टोळी आहे, ही टोळी थांबली पाहिजे”, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.

हेही वाचा : वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?

वाल्मिक कराडला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यानंतर न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, “यासाठीच धनंजय मुंडे आले होते. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी धनंजय मुंडेंना माणुसकी राहिली नाही. त्यांना फक्त पद आणि पैसे पाहिजेत. खंडणीतील आरोपी हा हत्या प्रकरणातील आरोपी आहे. बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. मात्र, धनंजय मुंडेंना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यांचं पाप झाकण्यासाठी त्यांची टोळी रस्त्यावर उतरवली जात आहे. धनंजय मुंडेंना जातीय दंगली घडवायच्या आहेत, मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवावं. अशा टोळीमुळे सर्वसामान्य लोकांना त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाहीत” असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

“आरोपींना सोडून द्या, यासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या घरी जाऊन धनंजय मुंडे भेटतात. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था धनंजय मुंडे यांना चांगली ठेवायची नाही का? कारण न्यायालयासमोर जाऊन गोंधळ करतात आणि पोलिसांनी दादागिरी करु नये, असं हे बोलतात. ही भाषा धनंजय मुंडेंच्या टोळीची आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला हा डाग आहे. सरकारला डाग लावण्याचं काम धनंजय मुंडे करत आहेत. आम्हाला आता त्यांच्याबाबत शंका यायला लागली आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना माझं आवाहन आहे की बीड जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. त्यासाठी धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी थांबवा, जर हे आरडाओरडा करायला लागले तर आम्ही सहन करणार नाहीत”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange on santosh deshmukh valmik karad police custody for 7 days beed court and dhananjay munde gkt