Manoj Jarange : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. मात्र, अद्यापही या घटनेतील काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि फरार आरोपींना अटक करण्यात यावं, यासाठी बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या मोर्चाच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. “मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. तसेच राज्यभरात जिल्ह्या-जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलतान सांगितलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“बीड जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आज मोर्चा काढत आहोत. बीड जिल्ह्यातील जनतेला माझं आवाहन आहे की सर्वांनी मोर्चांमध्ये सहभागी व्हावं, राज्य सरकारला जाग येईल. मात्र, जर सरकारला जाग आली नाही तर आम्ही सरकारला जाग आणण्याचं काम करू. या घटनेत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत. या घटनेत कोणीही मग विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्षांनी राजकारण आणू नये. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. या मोर्चात सत्ताधाऱ्यांनाही सहभागी व्हायचं असेल तर आम्ही नाही म्हटलेलं नाही. विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करावं”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या तपासाबाबत हालगर्जीपणा करू नये. जाणून बजून तुमच्या सत्तेत काही लोक आहेत. तुम्ही जातीवाद पसरेल असं काही काम करू नका. काही लोक गुंडगिरी करायला लागले, काही लोक बंदूका दाखवायला लागले, काही लोक शिवीगाळ करायला लागले, जमिनी बळकायला लागले, पोलिसांना आरेरावी करायला लागले आहेत. मग याचा बिमोड करण्याचं काम सरकारचं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांभाळू नये. अन्यथा हे बाजूला होतील आणि तुम्हीच तोंडघशी पडताल. मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा, यांना पाठीशी घालू नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तुम्ही आरोपींना अटक करा. या घटनेत कोणाकोणाचे रेकॉर्ड आहेत ते तपासा आणि मग त्यामध्ये मंत्री असो किंवा खासदार असो किंवा कोणीही असो त्यांना लगेच जेलमध्ये टाका. आज १९ दिवस झाले तरीही आरोपी सापडत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री देखील यांना पाठीशी घालत आहेत का?”, असा सवाल उपस्थित करत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

‘प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार’

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी आता प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना वाटतं की आता वातावरण तापलेलं आहे तोपर्यंत शांत बसा. मात्र, आरोपींना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसत नसतो. बीडचा मोर्चा झाल्यानंतर आता राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघणार आहेत. आता मराठा समाजाने जिल्ह्या-जिल्ह्यात शांततेत मोर्चा काढण्यासाठी तयारीला लागावं”, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange on sarpanch santosh deshmukh case beed morcha and cm devendra fadnavis beed politics gkt