गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अवधी दिली आहे. ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, तर पुन्हा उपोषणाला बसू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. दुसरीकडे, राज्यात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
शरद पवारांच्या या मागणीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा, तुम्हाला जे करायचं आहे, ते करा, पण आधी मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- “एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
राज्यात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, या शरद पवारांच्या मागणीबाबत विचारलं असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही जातीनिहाय जनगणना करा, नाहीतर पुरावे जमा करा. तुम्हाला जे काय करायचं ते करा. आता मी एकदाच सगळ्या पक्षांना सांगितलं आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात जाऊ नका. तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, मग जनगणना करा. त्यानंतर ५० टक्क्यांची मर्यादा वाढवा, नाहीतर आरक्षण ५०० टक्क्यांवर घेऊन जावा. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आधी मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण द्या.”
हेही वाचा- “महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
राज्यात कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते.