Manoj Jarange On Suresh Dhas Meeting Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने उचलून धरले आहे. या गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांच्याकडून प्रशासनावर दबाव टाकला जात आहे. यादरम्यान सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ते भेटायला गेले असतील यावर माझा विश्वासच बसत नाही आणि गेले असतील तर हे दुर्दैव आहे. त्यांच्या इतका विश्वासघातकी या पृथ्वीतलावर कोणी जन्मू शकत नाही, अशी भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे काय म्हणाले?

ज्या लोकांनी टीका केली, ज्या लोकांनी यांची राजकीय कारकीर्द बरबाद करायचं असं ठरवलं, असं तेच म्हणाले. यांनी तिथंच भेटायला जाणं… आपली माणसं मारून टाकणार्‍याचं का तोंड बघायचं? इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता, ज्याच्या लोकांनी खून घडवून आणला, त्यांना एकदाही देशमुख कुटुंबाकडे यावं नाही वाटलं? तुम्हाला भेटायला जाण्याइतकी का माया फुटली, ते काय कोमामध्ये आहेत का? इतक्या क्रूर माणसाला भेटायला जाता तर मग गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? देशमुख कुटुंब उन्हात पडलं आहे, तुम्ही झोपेत आहात का? तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे फिरता. नाहीतर मग यामध्ये यायचं नाही… इकडं समाजाकडून वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाचा हात पाठीवर पाहिजे… आणि राजकारण पण करायचं… कोणतं तरी एकच काहीतरी करावं … इथं बाकिचे नाहीत का? मोठेपण घ्यायची, सन्मान घ्यायची हाव तर खूप आहे, मग शेवट होईपर्यंत मान तुटेपर्यंत लढायचं देखील, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी सुनावले .

त्यांनी माणसं कापून टाकली आहेत, त्यांना भेटायला जाता? मराठ्यांनी तुमच्यावर विश्वास टाकला. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालवता का? काळीज कापून नेणारा हा पहिलाच पृथ्वीतलावरील माणूस असू शकतो. ज्यांनी क्रूर हत्या केली, देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं, त्या क्रूरकर्म्याला भेटायला जातात म्हणजे हे प्रकरण शंभर टक्के षडयंत्रामध्ये गुंतलं आहे. यांना आरोपी सोडून द्यायचे आहेत. चार्जशीट फोडायचं आहे. हे प्रकरण यांना पूर्ण दाबून टाकायचं आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.

“जसं खून करणार्‍यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून जो घडवून आणतो तो दोषी असतो ना, तसं एकही आरोपी सुटला तर सकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार आहेत. जे फडणवीस यांनी केलं नाही ते धस यांनी केलं. या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. यांना फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवर वार करायचे होते. जर सुरेश धस भेटले असतील तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावर त्यांनी वार केला आहे,” असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.