मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देणारं विधेयक मंगळवारी (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं. दरम्यान, या अधिवेशनात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे पाटील हे धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. त्यांना लगाम घालणार आहात की नाही, असा सवाल भुजबळ यांनी राज्य सरकारला केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. ५४ लाख मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आमचा कुणबी जातप्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जावा. ज्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलं त्यांना हे सरकार आरक्षण देत नाहीये आणि काही लोकांनी ओबीसीतून आरक्षण घेण्यास नकार दिला त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाचा घाट का घातला जातोय?

दरम्यान, मनोज जरांगे पाटील म्हणाले, एकीकडे राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाहीये आणि तिकडे तो येवल्याचा नेता वाट्टेल ते बडबडतोय. तो म्हणे मनोज जरांगे गोधडी पांघरून आत मोबाईलमध्ये काय बघतो ते माहिती आहे. अरे, तुला काय माहिती मी आत काय बघतो. मो गोधडीत मोबाईलमध्ये काय बघतोय हे त्याला कोण सांगतंय ते मला माहिती आहे. मी त्याला शोधून काढलंय. हा घातपाताचा प्रकार आहे. आमचंच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो. मी त्याला एवढंच सांगेन की त्याने असं काही करू नये.

भुजबळांचा कार्यकर्ता जरांगेंच्या गोटात?

आंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळावरील माहिती कोणीतरी छगन भुजबळांना देत आहे असा दावा करत मनोज जरांगे म्हणाले, येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलंय. पण मी त्या गद्दाराला सांगेन की, मराठ्यांशी बेईमानी करू नको. मी आत्ता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतोय. रोज आमच्याबरोबर उठतो-बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतीष्ठा मिळाली आहे. मी त्या गद्दाराला सांगेन की तू त्याला (छगन भुजबळ) काही सांगू नको. तो काही तुझा पणजोबा नाही. इथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे, त्याच्यासाठी काहीतरी कर. जातीशी गद्दारी करू नको. मी आज जे काही करतोय ते केवळ माझ्या जातीसाठी करतोय.

हे ही वाचा >> बाबा सिद्दीकींच्या अजित पवार गटातील प्रवेशानंतर काँग्रेसची आमदार झिशान सिद्दीकींवर कारवाई

मनोज जरांगे छगन भुजबळांचं नाव न घेता म्हणाले, मी माझ्या गोधडीत काय करतो त्याच्या चौकशा तू करू नको. माझ्या गोधडीत घुसू नको. साल्हेरच्या किल्ल्यावर तू कुठला कार्यकर्ता पाठवला होता ते मला माहिती आहे. तिथे गर्दीत टेम्पो कसा घुसला तेही मला माहिती आहे. लवकरच मी यावर जाहीरपणे बोलेन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil accused chhagan bhujbal sent man to ambush maratha reservation protest asc