Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की “मंत्री धनंजय मुंडे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे जातीचं पांघरून घेत आहेत. हे त्यांचं षडयंत्र आहे. ओबीसींचं पांघरून घेऊन स्वतःची पापं लपवण्याची धडपड करत आहेत. त्यांनी केलेली पापं ओबीसींच्या मताने झाकण्याचा प्रकार चालू आहे. हे चुकीचं आहे. सामान्य जनता व पुढारी असं वागू लागले तर ही एक नवी रूढी तयार होईल आणि ती समाजासाठी खूप घातक आहे”.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड व त्याची गुंडांची टोळी आहे. संपूर्ण समाज त्या टोळीच्या मागे नाही. केवळ एक लाभार्थ्यांची टोळी त्यांच्या मागे उभी राहिली आहे. ओबीसी तर नाहीच नाही. कारण हा खून कोणालाही मान्य नाही. ही कोणालाही पटलेली गोष्ट नाही. मुद्दाम काही गुंडांना वाचवण्यासाठी लाभार्थ्यांची टोळी मैदानात उतरली आहे. ही टोळी आरोपीच्या बाजूने बोलते, त्याची साथ देते. काही लोक म्हणतात आमच्या मंत्र्याला काही बोलू नका. परंतु, तो तुमचा मंत्री नाही तो सरकारमधला मंत्री आहे. संवैधानिक पदावर बसलेला आहे. मंत्र्याला बोलावच लागतं”.
हे ही वाचा >> “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
मनोज जरांगे काय म्हणाले?
जरांगे पाटील म्हणाले, “असंच होत राहिलं तर उद्या आमच्या समाजाच्या मंत्र्यांनी काही चूक केली तर आम्ही देखील तेच करायचं का आम्ही देखील त्या मंत्र्यासाठी आंदोलन करायचं का? ही अशी रुढी चांगली नाही. मला या गुंडांना पाठीशी घालणाऱ्यां प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला लोकांना मारून टाकायचं आहे का? संतोष देशमुख यांचा खून झाला आहे. त्याचा भाऊ त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वणवण फिरतोय. मात्र हे गुंड त्याला धमक्या देतात. पोलीस ठाण्यात जाऊन त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो गुंड केवळ त्यांच्या जातीचा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही काही कुठल्या जातीविरोधात बोलत नाही किंवा तो तुमचा नेता आहे म्हणून बोलत नाही. तो सरकारमधला मंत्री आहे. आम्ही गुंडांना बोलत आहोत. याच्याशी ओबीसींचा किंवा कुठल्याही जातीचा काहीच संबंध नाही. तरी देखील तुम्हाला त्या वाल्मिक कराडला पाठीशी घालायचं असेल तर माझा त्यांना एकच प्रश्न आहे की तुम्हाला लोकांना कापून टाकायचं आहे का?”