Manoj Jarange Patil Appeal To Maratha Community for Hunger Strike for Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता व निवडणुकांमुळे मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नव्हते. मात्र, आता त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा लावून धरण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे यांनी नव्या सरकारसमोर आव्हान उभं करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकादा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी आज (२६ नोव्हेंबर) बीड येथे पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन केलं आहे की आपण आंतरवालीत उपोषणाला बसायचं आहे. ते म्हणाले, “सरकार स्थापन झाल्यावर मी तारीख जाहीर करेन. त्या तारखेपासून मी आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे. तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी व्हा”.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आता निवडणूक झाली आहे, तो विषय आपल्यासाठी आता संपला आहे. या निवडणुकीत कोण पडला, कोण निवडून आला हे सगळे विचार मराठ्यांनी आता डोक्यातून बाहेर काढायला हवेत. तुम्हाला हवा असलेला उमेदवार जिंकला नसेल तरी सुतक पाळल्यासारखं वागण्याची आवश्यकता नाही. आपल्याला कशाचं सुतक असण्याचं कारण नाही. आपल्यासाठी निवडणुकीचा विषय आता संपला आहे. तुम्हाला ज्यांना मोठं करायचं होतं त्यांना तुम्ही मोठं केलं आहे. कोणी आमदार झाले, त्यातले काहीजण आता मंत्री होतील. त्यांचं व्हायचं ते होईल. ज्याला त्याला जे जे हवं ते ते मिळालं. परंतु, मराठ्यांनो आता तुमचं काय? तुमच्या मुलांचं अस्तित्व काय? तुमच्या मुलांच्या भविष्याचं काय?”

हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

जरांगे म्हणाले, “तुम्हाला तुमच्या मुलामुलांच्या भविष्याकडे बघितलेच पाहिजे. त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवलाच पाहिजे. त्यामुळे मी सर्व मराठ्यांना या पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो, हात जोडून विनंती करतो, आता तुमच्या लेकरांचं बघा. स्वतःच्या लेकरांसाठी लढाई लढण्याची वेळ आली आहे. तुमच्या मुलाला उद्या शाळेत महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. तिथे त्याला प्रमाणपत्र दाखवावं लागेल. त्याला कोणत्याही क्षेत्रात नोकरी करायची असेल, शिक्षण घ्यायचं असेल, त्यालाही डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनिअर व्हायचं असेल, जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा पोलीस किंवा अन्य काही व्हायचं असेल तर तुमच्या लेकराला आरक्षणाची गरज भासेल. त्यामुळे तुमच्या मुलांसाठी आता रस्त्यावर उचला उतरा”.

हे ही वाचा >> आज-उद्या शपथविधी होणार नाही! राष्ट्रवादीने सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी; मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले..

आमदार, मंत्र्याच्या नादाला लागू नका : मनोज जरांगेंचं वक्तव्य

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे मराठा समाजाला आवाहन करत म्हणाले, “निवडणुकीचं, राजकारणाचं खुळ आता डोक्यातून काढून टाका. वेडेपणा करू नका. तुमचा नेता मंत्री झाला असेल, आमदार झाला असेल तर त्याच्या गुलालात नाचू नका. तो तुम्हाला नाचवेल. परंतु, तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकरांच्या मदतीला येणार नाही. तुमच्या लेकराला शाळा, महाविद्यालयात प्रवेश हवा असेल तर तिथे तो मदत करणार नाही. त्याला नोकरी लावून देणार नाही. आगामी काळात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या भरत्या निघणार आहेत, त्यामुळे आरक्षणासाठी तुटून पडा.