मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. यासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. याच मागणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत आहेत, असं म्हणत भुजबळांनी जरांगे-पाटलांवर हल्लाबोल केला होता. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
“आता संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्या, अशी मागणी केली जात आहे. त्याविरोधात आम्ही बोलणारच… कारण, चार ओबीसी आयोगांनी आणि सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण नाकारलं आहे. आता नवनिर्मित नेते मागण्या वाढवत आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त विरोध करणार आहोत,” असं भुजबळांनी म्हटलं होतं.
“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, ही भुजबळांची भूमिका”
यावर ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीकास्र डागलं आहे. “ते येड आहे, लय शहाणं आहे का? तूच लय शहाणं आहे आणि सरकार येड आहे का? नोदींबाबत सरकारला काहीच कळत नाही का? मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्यानं भुजबळांच्या पोटात दुखत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, ही भुजबळांची भूमिका आहे,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला.
“भुजबळांनी कितीही आडवं आलं, ओबीसीतून आरक्षण मिळवणारच”
“भुजबळांनी सगळ्यांच्या टाळुवरचं लोणी खाललं आहे. फुकट खाऊन भुजबळ बरळत असतात. २० जानेवारीला मराठे मुंबईत जाण्यासाठी निघणार आहेत. भुजबळांनी कितीही आडवं आलं, तरी ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवणारच,” असा निर्धार जरांगे-पाटलांनी व्यक्त केला आहे.