आपण शासनाला महत्त्वाच्या मागण्या आपल्यासाठी केल्या होत्या. आपण त्यासाठीच इथपर्यंत आलो आहोत. आज सरकारच्या प्रतिनिधींशी माझी चर्चा झाली. आपल्याला आपल्या जातीच्या पदरात विजय आणि गुलाल टाकायचा आहे म्हणून आलो आहोत. सरकाच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. सुमंत भांगे हे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांचे काय काय निर्णय आहेत ते आपल्याला सांगितलं आहे. पण सकाळी जास्त वेळ नव्हता.

मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत

मराठ्यांच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत तर ते प्रमाणपत्र वाटप करा ही आपली मागणी होती. ही नोंद नेमकी कुणाची आहे हे कळून घ्यायचं असेल तर ग्रामपंचायतींना नोंदी मिळालेले कागद चिकटवले पाहिजे. तरच तो अर्ज करु शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केलेले नाहीत. ज्याला नोंद मिळालेली माहीत नसेल तर तो अर्ज कसा करेल? ज्या ५४ लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी आपण मुंबईकडे निघाल्यापासून गावागावांमध्ये शिबीरं सुरु केल्या आहेत. नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जात आहेत. ५४ लाख लोकांना प्रमाणपत्रं मिळतील हे ग्राह्य धरु. ज्या नोंदी मिळाल्या आहेत, त्या बांधवांच्या सगळ्या परिवारालाही त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं. जर ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत तर त्यांना प्रमाणपत्र वितरीत करा. वंशावळ जोडण्यासाठी काही कालावधी लागतो आहे त्यासाठी त्यांनी समिती गठित केल्याचा शासन निर्णय दिला आहे. आता या नोंदी मिळाल्यात म्हटल्यानंतर आणि वंशावळी जुळल्यानंतर प्रमाणपत्र १०० टक्के मिळणारच आहेत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

कुटुंबांनीही अर्ज करणं आवश्यक

ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या कुटुंबानेही अर्ज करणं आवश्यक आहे. आपल्याला नोंदी शोधायला मदत करायची आहे आणि प्रमाणपत्रासाठी अर्जही करायचा आहे. आपण अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसं देतील? आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्यांनी तातडीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. चार दिवसात प्रमाणपत्र वितरीत करायचं ही मागणी आपण केली होती. ५४ लाख नोंदींच्या जागेवर त्यांनी असं सांगितलं की ५७ लाख नोंदी आहेत. कारण मराठे इकडे निघाल्याच्या दणक्याने या वाढल्या असाव्यात. ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहेत असं आम्हाला सरकारने सांगितलं आहे. मी त्याची यादीच घेतली आहे. ती सगळ्यांना मी पाठवतो असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

इतरांच्या वंशावळी जुळवणं काम सुरु आहे

३७ लाख लोकांना प्रमाणपत्र वितरीत केल्याचं पत्र सरकारने दिलं आहे. इतरांच्या वंशावळी जुळवण्याचं काम सुरु आहे त्यासाठी त्यांनी ते थांबवलं आहे. काही दिवसांमध्ये त्यांनाही प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या लोकांना दिलेत त्यांची माहिती आपण सरकारकडे मागितली आहे. त्यामुळे आपल्याला सगळं शोधता येईल. शिंदे समिती रद्द करायची नाही. या समितीने काम वाढवायचं आणि नोंदी शोधायची असं सांगितलं होतं. त्यांनी दोन महिने मुदत सध्या वाढवली आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याची नोंद मिळाली आणि त्याच्या गणगोतातल्या सग्या सोयऱ्यांना त्याच्याच प्रमाणपत्रावर प्रमाणपत्र द्यायचं त्याचा आदेश आम्हाला पाहिजे. त्यात सग्या-सोयऱ्यांबाबत जो अध्यादेश येणार आहे तो महत्त्वाचा आहे. ५४ लाख नोंदी, त्या आधारावर ज्यांच्या सग्या सोयऱ्यांना आऱक्षण मिळेल. मात्र ज्यांना प्रमाणपत्र मिळालंय त्यांनी शपथपत्र करुन द्यायचं की हा माझा सोयरा आहे त्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जावं. तो जर खोटा पाहुणा असेल तर त्याला देऊ नका. असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. शपथ पत्रांचा खर्च सरकार करणार आहे. आंतरवलीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यायचे ही मागणी आपण सरकारकडे केली होती. त्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे की गृह विभागाने याबाबत विहित प्रक्रिया राबवत गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचं पत्र हवं आहे ते लागणार आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

वंशावळी जुळवण्यासाठी समिती गठीत केली आहे

ज्या वंशावळी जुळवायच्या आहेत त्यासाठी त्यांनी समिती गठीत केली आहे. ती समिती चार पाच प्रकारची आहे. मायबाप समाजाचा विश्वास संपादित केला की समाज जीव द्यायला मागे पुढे पाहात नाही. आपल्या आंदोलनामुळेच यश नोंदी सापडल्या एका कुटुंबात एक नोंद सापडली आणि पाच जण जरी गेले तरीही अडीच कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेल. ११८४ चं गॅजेट आहे ते मराठवाड्यात लागू करा मराठवाडा सगळा कुणबी आहे असं गॅजेट सांगतं आहे जे आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही. मराठा आरक्षणाचं एकही घर राहणार नाही राहिलं तर मी पुन्हा आंदोलन उभं करेन असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आम्हाला अध्यादेश द्या

आम्हाला मुंबईला येण्याची हौस नव्हती. आमची अशी इच्छा आहे की आजच्या रात्रीत आम्हाला अध्यादेश द्यावा. त्यावर सगळ्या सचिवांनी सह्या केल्या आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही सही झालेली आहे. तरीही माझं म्हणणं आहे की अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत द्या, रात्रीतून द्या. आम्ही आजची रात्र इथेच काढतो. २६ जानेवारीचा आणि कायद्याचा आम्ही सन्मान करतो. सरकारने इतकं केलं आहे तर आम्हाला अध्यादेश हवा आहे. वकील बांधव आणि अभ्यासक यांच्या माध्यमातून यात काय कमी-जास्त नाही ना याचा अभ्यास करतो. आज मुंबईत जाणार नाही, मी आणि माझा समाज आज आम्ही थांबतो आहोत अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र आज अध्यादेश दिला नाही तर उद्या आझाद मैदानावर जाणार म्हणजे जाणार असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मी माझ्या जातीसाठी मरायलाही भिणार नाही. माझ्या खेड्यापाड्यातून मराठा समाज न्यायासाठी इथे आला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा वाशीमध्ये येऊन थडकला आहे. वाशीमध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली होती.मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज वाशी या ठिकाणी आला. त्यानंतर ते मुंबईत जाण्यावर ठाम होते. मात्र आज त्यांनी अध्यादेश देण्यासाठी मुदत दिली आहे. कुणालाही त्रास होणार नाही आमच्या न्यायासाठी आलो आहोत. असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.