Manoj Jarange Patil Latest News : जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. यादरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आरोपींविरोधात कारवाई

विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर अशी पोलिसांनी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह ९ वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केली आहे. या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. 

मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणार्‍या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्यासंबंधी जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. २०१९ पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखीही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची देखील माहिती मिळत आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

दोन कोटी मराठ्यांची सभा होती तिथं देखील मी आई-बापाला बसू दिलं नाही. इथं समाज माझा माय-बाप आहे. सगळं कुटुंब जरी आत टाकलं तरी मी मराठ्यांसाठी मागे सरकणार नाही. मला असं वाटतं, हे तोंड बंद करण्यासाठी दिसतंय. माझं बोलणं बंद करण्यासाठी हे नवीन षडयंत्र दिसत आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी टीव्ही९शी बोलताना दिली.

दरम्यान या कारवाईसंबंधी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “कोणाचा नातेवाईक आहे यावर अटक होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर त्यावर अटक होत असते. मला याची माहिती नाहीये, मी योग्य माहिती घेऊन तुम्हाला सांगेन”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil brother in law tadipar vilas khedkar expulsion devendra fadnavis rno news rak