गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. कीर्तनकार अजय बारसकर यांनी पत्रकार परिषदा घेत जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलीय. मनोज जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांत बंद दाराआड बैठका घेतल्या आहेत, असा आरोप बारसकर यांनी केला. दरम्यान, या आरोपांनंतर आता मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेयत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस माझं एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. ते आज ( २५ फेब्रुवारी) अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय”

मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे.

“मला त्यांनी मारून दाखवावं”

“मी आज तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो. माझा त्यांनी बळी घेऊन दाखवावा. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही,” असेदेखील जरांगे म्हणाले.

“नारायण राणेंनी गेवराई, अंबडमधून काही लोक नेले”

“मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातील २ आणि अंबड तालुक्यातील एकजण नारायण राणेंनी उचलून नेला आहे. त्यांच्या माध्यमातूनही आता पत्रकार परिषदा चालू होणार आहेत. देवेंद्र फडणवीस जर असं करू नको म्हणाले तर नारायण राणेंची असं काही करण्याची हिंमत नाही. त्यामुळे हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. फडणवीस म्हणाले तर एका मनिटात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईल,” असाही आरोप जरांगे यांनी केला.