मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. एक महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना दिलं आहे. परंतु, या एक महिन्यात मी आंदोलन सुरूच ठेवेन असं जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे दौरे सुरू केले आहे. या दौऱ्यांमधून ते मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याचं काम करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे यांच्या दौऱ्यांना लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी जरांगे यांचं मोठं स्वागत केलं जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचं राजकीय वजन वाढू लागल्याचं दिसतंय. परिणामी मनोज जरांगे आता राजकारणात उतरणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी त्यांची आगामी काळातली भूमिका स्पष्ट केली आहे. काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलताना जरांगे यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केलं.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकारणात जायची इच्छा नाही. मी मराठा समाजाची सेवा करतोय. मला नेता बनायचं नाही. मराठा समाजाला अनेक पिढ्यांपासून आरक्षणाच्या वेदना आहेत. त्यासाठी हा लढा उभा राहिला आहे. सर्वसामान्य मराठा समाजातील प्रत्येकजण या लढ्यात उतरला आहे. त्यामुळे १०० टक्के मराठा आरक्षण मिळणारच.

हे ही वाचा >> “त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला

मनोज जरांगे यांच्या या उत्तरावर त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही यापुढे राजकारणात येण्याचा विचार केला आहे का? त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, तो प्रश्नच तुम्ही मला विचारू नका. ते माझ्या डोक्यात नाही. ती आपली वाटच नाही. आपली वाट एकच आहे, मराठा आरक्षण हीच आपली वाट. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, बस इतकंच आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil clarified his stance on whether he would enter politics asc