मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं. सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला. आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांनी मनोज जरांगे यांना पाणी आणि उपचार घेण्याच्या विनंती केली. त्यानंतर त्यांनी या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे म्हणाले, “गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीये आणि तेही जेवण करत नाहीये. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला. मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे.”
“त्यामुळे गड्यांनो मला माफ करा”
“गादीने मराठा समाजाच्या कल्याणासाठी कधीही माघार घेतलेली नाही. मीही समाजाच्या कल्याणासाठी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीही खाली पडून दिला नाही. मात्र, माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी, समाजाला न्याय मिळावी म्हणून मला ही कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मराठ्यांची लेकरंबाळं फार तरसली आहेत. त्यामुळे गड्यांनो मला माफ करा,” अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
“मी पाणी उपचार घेऊ शकत नाही”
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “यात तुमचेच मराठ्यांची लेकरं आहेत. त्या लेकरांसाठी गड्यांनो मला माफ करा. मी पाणी उपचार घेऊ शकत नाही. कारण माझ्या लेकरांच्या काय वेदना आहेत या सरकारने ओळखल्या पाहिजेत. सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावावा.”
हेही वाचा : मनोज जरांगेंच्या उपोषणावर शरद पवार स्पष्टच म्हणाले, “जे करणं शक्य नाही त्याचा शब्द…”
“मराठा जातीवर खूप अन्याय झाला आहे”
“समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. मराठा जातीवर खूप अन्याय झाला आहे. आता अन्याय होऊ द्यायचा नाही. म्हणून ही लढाई आहे. इथे माझा हेकेखोरपणा नाही, आडमुठेपणाही नाही. माझ्या जातीवर अन्याय झाला आहे. मला थांबता येणार नाही,” असंही मनोज जरांगे यांनी नमूद केलं.