सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देतो म्हणत आहेत आणि आरक्षण देत नाहीत. त्यांना आमच्या समाजाला आरक्षण द्यायचे नाही असे कोण म्हणते, त्यांची नावे सांगा. तुम्ही जर बऱ्या बोलाने आरक्षण देणार नसाल तर आम्हाला आता तुमच्याशी भांडण करावे लागेल, असे सांगत मनोज जरांगे-पाटील यांनी आज पुन्हा फडणवीस यांना लक्ष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे-पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातील शांतता फेरीनंतर झालेल्या सभेत त्यांना चक्कर आली होती. त्यामुळे त्यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी माझी प्रकृती ठीक असल्याचे सांगत पुण्याला जाण्यापूर्वी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज त्यांची भेट घेतली.

हेही वाचा – मराठा आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनाही विरोध; कुर्डूवाडीत अडवले, बार्शीत घोषणाबाजी, आत्मदहनाचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे छगन भुजबळ आणि इतर नेते माझ्या विरोधात आणि मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत. जे कोण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. काही झाले तरी फडणवीस यांना समाजाला उत्तर तर द्यावेच लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या अंगावर येऊ नये. मराठा समाज त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सरळ आरक्षण देणार नसाल तर तुमच्याशी भांडणच करावे लागेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र सरकार ऐकण्याच्या मन:स्थितीत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत मध्यस्थी केल्यास माझी काहीच हरकत असणार नाही असेही ते म्हणाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे ऐकून मराठा समाजाचे आंदोलन सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, ज्यांना पहिल्यापासून गाड्या फोडणे आणि दहशतवाद माजविणे हे जमते, ते शांतता धोक्यात आणतात. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. राज ठाकरेंना जे वैभव मिळाले आहे, ते गोरगरीब मराठा समाजामुळे मिळाले आहे. रोज उठसूट श्रीमंत लोकांमध्ये बसणाऱ्याला आरक्षणाचा मुद्दा कळणार नाही, त्यामुळे त्यांना मराठा समाजाच्या, गोरगरिबांच्या आरक्षणाची तीव्रता माहीत नाही, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. त्यांनी गोरगरीब जनतेच्या भावना जाणून घ्याव्यात आणि मग ठरवावे की यांना आरक्षणाची गरज आहे की नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाआक्रोश मोर्चा

कोणते ११३ आमदार पाडणार हे आत्ताच सांगणार नाही. वेळ आल्यानंतर सगळ्यांना कळेल की मी कोणते आमदार पाडणार आहे. आमदार महेश शिंदे यांना मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता माहीत नाही आणि ज्यावेळी आंदोलन सुरू असते तेव्हा त्यांचा टीव्ही बंद असतो. त्यामुळे त्यांना ते कळत नाही, अशी टीका त्यांनी आमदार शिंदे यांच्यावर केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil comment on devendra fadnavis says if devendra fadnavis will not give reservation we will have to fight with him ssb