मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं. आम्ही दिलेल्या १० टक्के आरक्षणावर कोणतंही कारण नसताना प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हे आरक्षण टिकणार नाही, असा दावा केला जातोय. मात्र हे आरक्षण नक्की टिकेल, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला. तसेच विरोधकांना संधी होती, तेव्हा त्यांनी आरक्षण दिलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जेव्हा संधी होती तेव्हा आरक्षण देण्यात आलं नाही
विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इतकी वर्षे मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती. मग आरक्षण का दिलं नाही. आम्ही आरक्षण दिल्यानंतर ते टिकणार नाही, असे म्हटले जात आहे. मात्र कोणत्या आधारावर हा दावा केला जातोय. जेव्हा संधी होती तेव्हा आरक्षण देण्यात आलं नाही. मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. मराठा समाजाच्या जीवावार अनेक नेते मोठे झाले.
मी जे बोलतो ते करून दाखवतो
माझी भूमिका प्रामाणिक असून मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे, असेही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. “हा एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो. हे धाडस आतापर्यंत कोणी दाखवलंय. मी दाखवलंय कारण माझी भूमिका प्रामाणिक आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी खोटं आरक्षण देणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता हे आरक्षण देण्यात येईल अशी भूमिका भूमिका घेतली. या भूमिकेप्रमाणेच आमचे काम चालू होते,” असं शिंदेंनी सांगितलं.
…त्यामुळेच तेव्हा आरक्षण टिकले नाही
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हादेखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं. फडणवीसांचे सरकार होते तोपर्यंत आरक्षण न्यायालयात टिकले. त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने न्यायालयात बाजू मांडायला हव्या होत्या, जे पुरावे द्यायला हवे होते ते देण्यात आले नाही. त्यामुळेच तेव्हा आरक्षण टिकले नाही,” असा आरोप शिंदेंनी केला.
आम्ही न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडू
“मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचा कोणाचा हेतू आहे का? मराठा आरक्षण टिकणार नाही, हे सांगताना विरोधकांकडे ठोस कारणं आहेत का? आम्ही मराठा आरक्षण देताना पुरेपूर काळजी घेतली आहे. या आरक्षणाला कोणीही न्यायालयात आव्हान दिलं तरी आम्ही न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडू,” असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.