देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं असून ज्या मराठ्यांनी त्यांना १०६ आमदार निवडून दिले, त्याच मराठ्यांच्या मुलांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मनोज जरांगे यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील. खरं तर मराठ्यांना राजकारणात जायचं नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसाच्या मराठाद्वेषीपणामुळे आम्हाला नाईलाजाने राजकारण यावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं, की अजूनही वेळ गेलेली नाही. आचारसंहिता पुढे दोन चार दिवस पुढे ढकलून आमच्या मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“…मग सरकरला पश्चाताप करायची संधीही मिळणार नाही”
“सरकारने कुणाचीही मागणी नसताना १६-१७ जातींचा समावेश ओबीसीत केला. त्यांना आरक्षण दिलं. मराठ्यांना डिवचण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला, आम्ही तुम्हाला आरक्षण देत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, हे सांगण्याचा प्रयत्न एकप्रकारे सरकारने केला. पण याचे परिणाम आता वाईट होतील. मग सरकरला पश्चाताप करायची संधीही मिळणार नाही”, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
“देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं”
“मराठ्यावर अन्याय करून तुम्ही सत्ता काबीज करायला बघत असाल, तर हा त्यांचा गैरसमज आहे. आजपर्यंत जो कुणी मराठ्यांच्या नादी लागला आहे. त्याच बिमोड करण्याचं काम मराठ्यांना केलं आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. अन्यथा मराठा समाज तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं आहे. ज्या मराठ्यांनी यांना १०६ आमदार निवडून दिले, त्याच मराठ्यांच्या मुलाचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.
© IE Online Media Services (P) Ltd