लक्ष्मण हाके जर इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते, तर आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं, असा टोला मनोज जरांगे यांनी लगावला आहे. तसेच आम्हाला मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास असून १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनोज जरांगे सध्या परभणीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “… म्हणून लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला”, मुख्यमंत्री शिंदेंचे मतदारांवर खापर…

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

मी मागील १० महिन्यात एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही. त्यांना त्रास दिलेला नाही. ओबीसी नेत्यांनासुद्धा मी दुखावलेलं नाही. हाके जर इतक्या जोमाने एसटी आरक्षणासाठी लढले असते, तर आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. धनगर आणि मराठ्यांमध्ये कोणतेही भांडण नाही. हे भांडण लावण्याचे काम काही नेते करत आहेत. एनटी-विजेएनटी हा वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाने एनटी-विजेएनटीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे कुणीही सांगेन, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना, ही लढाई २७ टक्क्यांपैकी १९ टक्क्यांची आहे. हे माहिती असून सुद्धा हाके यांनी भुजबळांचे ऐकून भांडण सुरू केलं आहे. धनगर समाजालाही हे माहिती आहे. त्यांनी त्यांच्या एसटी आरक्षणासाठी लढावं, मराठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहिल. सर्वात आधी मी पुढे येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

हेही वाचा – “…तर आपण रनआऊट होणार”, फडणवीसांचा महायुतीला सल्ला; विधानसभेच्या जागा सांगत रणशिंग फुंकलं

सगेसोयऱ्यांच्या अंमलजबावणीबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवला आहे. १३ तारखेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होतील. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, ही आमची मागणी आहे. ती मागणी बदललेली नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे. ओबीसीच्या यादीत ८३ क्रमांकावर कुणबी आहे. त्यानंतर या यादीत ज्या १८० जातींचा समावेश करण्यात आला, त्यांच्या ३०० पेक्षा जास्त उपजातींचा समावेश केवळ व्यवसाय शेती आहे म्हणून करण्यात आला आहे. मग कुणबी आणि मराठ्यांचाही व्यवसाय शेती आहे. असे असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण का नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. यासंदर्भात हैदराबाद आणि सातारा संस्थान तसेच बॉम्बे सरकारच्या नोंदी आहेत. त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. म्हणूनच छगन भुजबळ यांनी काही लोक बोलण्यासाठी उभी केली आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil criticized laxman hake in parbhani obc maratha st reservation spb
Show comments