राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण देणारे, विधेयक मंजूर केलंय. मात्र मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी मात्र हे आरक्षण टिकणारे नाही असे म्हणत आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हवंय अशी मागणी केली. सगेसोयऱ्यांविषयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी घेऊन ते सध्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. याच उपोषणावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. त्यामुळे आता आंदोलन करण्याची गरज नाही, असं भुजबळ म्हणालेत. याच विधानावर जरांगे यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलंय. आमच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? असा प्रतिप्रश्न जरांगेंनी केलाय. ते अंतरवाली सराटी येथे माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमच्या आंदोलनाविषयी विचारणारे ते कोण?

“आंदोलनाचं कारण विचारणारे छगन भुजबळ कोण आहेत. मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावण्याचं काम का करता, असं आम्ही त्यांना विचारलं का? आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार नाही का? आम्ही रोज आंदोलन करू शकत नाही? असा काही नियम आहे का? आमच्या आंदोलनाविषयी विचारणारे ते कोण आहेत?” अशी प्रश्नांची सरबत्तीच मनोज जरांगे यांनी केली.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

मालेगावमध्ये गुरुवारी (२२ फेब्रुवारी) छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला होता. त्यानंतर या घटनेवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलनावरही भाष्य केलं. “मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तेव्हादेखील मी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं की तरीदेखील आंदोलन करण्याचं काही कारण नाही. शांतता बिघडवण्याचं काही कारण नाही. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. वेगवेगळे पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी मतदारांना भेटणार आहेत. गावागावात जाणार आहेत. अशा रितीने लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना अडवले जात असेल तर ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा, ओबीसी, भटक्या समजातील कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं पाहिजे. आता अडचण काय आहे,” असा सवाल भुजबळ यांनी केला.

“सरकारने आपली भूमिका पार पाडली”

“आम्ही मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला विरोध केला असता तर समजू शकलो असतो. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. यात लोकसंख्या फार मोठी आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणेच सरकारने आपली भूमिका पार पाडली आहे. त्यासंदर्भात कायदा मंजूर केला आहे,” असेही भुजबळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil criticizes chhagan bhujbal for commenting on maratha reservation protest prd