जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच मी बघतो, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भातील मागणी केली.

हेही वाचा – ‘शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाने भाव लावला’, पैसे वाटल्याचा आरोप करत संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

१९६७ मध्ये ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं, तेव्हा त्याच्यात १८० जाती होती. त्यात ८३ क्रमांकावर कुणबी ही जात होती. त्यानंतर या जातींच्या पोटजाती यात समावेश करण्यात आला. मग यात मराठा जातीचा समावेश का करण्यात आला नाही? जर यात मराठा समाजाला घेतलं नाही, तर मग इतर जाती कोणत्या आधारावर घेतल्या, याचं उत्तर सरकारने द्यावं, असं जरांगे पाटील म्हणाले.

ओबीसींच्या यादीत लोकांच्या व्यवसायानुसार त्यांच्या जातीचा समावेश करण्यात आला. जर बागवाणचा समावेश जर शेती करतो म्हणून ओबीसींच्या यादीत केला असेल तर मुस्लीम समाजदेखील शेती करतो, त्यांच्यादेखील सरकारी नोंदी सापडल्या आहेत. जर माळी समजाला तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल, तर आम्हीही शेती करतो. मग आमचा समावेश या यादीत का नाही? याची उत्तरं आम्हाला हवी आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – NEET पेपरफुटीचे लागेबांधे महाराष्ट्रापर्यंत; लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेतले, चौकशीनंतर सुटका

सरकारी नोंदी या मारवाडी, ब्राह्मण, लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत. जर त्यांच्या नोदी शेतकरी कुणबी म्हणून निघाल्या असतील, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, आता सरकारने कायद्याने बोलावं, पाशा पटेल यांची सुद्धा कुणबी नोंद निघाली आहे. जर मुस्लिमांच्या नोंदी कुणबी म्हणून निघत असतील, तर राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, आणि सरकार आरक्षण कसं देत नाही, तेच मी बघतो, असा इशाराही त्यांनी दिला.