मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची शनिवारी (२३ डिसेबर) बीड येथे ‘निर्णायक इशारा सभा’ पार पडली. या सभेत मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईत २० जानेवारीला बेमुदत उपोषणाला बसणार असून माझ्याबरोबर हजारो मराठे तिथे येतील, अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, “ राज्य सरकारने एका बाजूला मराठ्यांना नोटीसा पाठवल्या आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे मी २० जानेवारीला मुंबईत बेमुदत उपोषणाला बसणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मी हे आंदोलन करेन.
दरम्यान, आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले, सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी. छगन भुजबळांचं ऐकून मराठा समाजावर अन्याय केलात तर तुम्हाला जड जाईल. त्यामुळे भुजबळांचं ऐकू नका. देशातली जेवढी राज्ये आहेत, त्यापैकी अनेक राज्यांमधील मोठी जात संपवण्याचा घाट तुम्ही घातलाय, असं चित्र दिसतंय. परंतु, एखादा मोठा समाज, मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल.
राज्य सरकारला इशारा देत जरांगे पाटील म्हणाले, आमचं आंदोलन दडपण्यासाठी नवनवीन पद्धती राबवू नका. तुम्ही एकदा असा प्रयोग केला आहे. अंतरवाली सराटीतल्या प्रयोगामुळे तुम्हाला आतापर्यंत भोगावं लागलं आहे. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. मराठा समाज एकत्र आला आहे. जो आता जागचा हलायला तयार नाही. त्यामुळे सामंजस्याने आणि ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर पुढचं आंदोलन तुम्हाला जड जाईल. आज इथे एकटा बीड जिल्हा आहे, उद्या संपूर्ण महाराष्ट्र असेल, तेव्हा ते आंदोलन तुम्हाला झेपणार नाही.
हे ही वाचा >> “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांनी आंदोलनाचं रणशिंग फुंकलं
या सभेत मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ‘येवल्याचा येडपट’ म्हणत टीका केली. एकदा आरक्षण मिळू दे मग तुला हिसकाच दाखवतो. खूप दिवस झाले तुझी फडफड चालू आहे, असं एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे.