मराठा समाजाचे नेते अशी ओळख निर्माण झालेले मनोज जरांगे पाटील रविवारपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला ठार करण्याचा डाव आखला आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अशात मनोज जरांगे पाटील हा फ्रॉड माणूस आहे असा आरोप त्यांच्याच एका जुन्या सहकाऱ्याने केला आहे. तसंच मागच्या १८ वर्षांचा त्यांचा इतिहास जाणून घ्या असं म्हणत मनोज जरांगे पाटील प्रसिद्धीसाठी हपापलेले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंच्या जवळच्या सहकाऱ्याने आरोप केला आहे. मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.
काय म्हटलं आहे वाळेकर यांनी?
” मनोज जरांगेंसह मी १७ ते १८ वर्षांपासून काम करतो आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतो आहे. २०११ ला त्यांनी एक संघटना उघडली. मी त्या संघटनेत होतो. कोपर्डी बलात्काराची घटना घडली त्यावेळी जरांगे यांनी एक बैठक घेतली. आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं. पीडित मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले. त्या बैठकीला आम्ही १० ते १२ जण होतो. आरोपीवर हल्ला करायचा असं त्यांनी सांगितलं. आम्हाला मढी या ठिकाणी एका रेस्ट हाऊसवर ठेवलं. आमच्यातले अर्धे लोक मागे फिरले. आरोपी अहमदनगर कोर्टात आला. आम्ही चौघे चार दिशांना होतो, मनोज जरांगे एका बाजूला उभे होते. आम्ही चौघांनी आरोपीवर हल्ला केला त्यावेळी जरांगेंनी तिथून पळ काढला. ” असा आरोप बाबूराव वाळेकर यांनी केला.
हे पण वाचा- “मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात, सगळा खर्च..”, मराठा आंदोलक संगीता वानखेडेंचे गंभीर आरोप
“मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत १० ते १२ लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. आम्ही तुरुंगात गेलो आणि प्रसिद्धी यांनी मिळवली. आम्ही तुरुंगात होतो पण आम्हाला काहीही मिळालं नाही. माझ्याकडे भयानक पुरावे आहेत, वेळ आली तर मी तेदेखील उघड करेन.” असा इशाराही वाळेकर यांनी दिला.
मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस
मनोज जरांगेंच्या आमिषाला कुणीही बळी पडू नका. मनोज जरांगे २०१९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. हा माणूस हार-तुरे आणि सत्कार याच्यासाठी भुकेला आहे. आत्महत्या ज्या गावात झाली तिथे जायचं आणि लोकांकडून सत्कार घ्यायचे असे त्याचे उद्योग आहेत. मनोज जरांगेने राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर आरोप केलेला नाही. मराठा समाजाला ढाल करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. राजेश टोपे २०१९ ला यांना भेटले होते. आत्ताही आंदोलन सुरु असताना राजेश टोपे आणि त्यांची गुप्त भेट झाली होती असाही आरोप वाळेकर यांनी केला.