मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं. सरकारने मागितल्याप्रमाणे ४० दिवसांचा वेळ देऊनही मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला. आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती काहिशी खालावली. त्यामुळे उपस्थितांनी जरांगेंच्या कुटुंबाला आंदोलनस्थळी आणलं. मात्र, यानंतर जरांगे पाटील संतापलेले पाहायला मिळाले. त्यांनी उपस्थितांना स्पष्ट शब्दात यापुढे माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नका, असं सांगितलं.
मनोज जरांगे म्हणाले, “प्रत्येकाचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं, तसंच माझंही आहे. परंतु आंदोलन करत असताना मी कुटुंबाचा नसतो, तर मराठा समाजाचा असतो. यापुढे माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नका. कारण प्रत्येकाला लेकरं, आई-बाप बघितल्यावर माया येते. यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते.”
“…म्हणून मी खवळलो”
“कुटुंब बघितल्यावर हुंदका भरून येतो. त्यामुळे दोन दिवस जास्त उपोषण करायचं असेल, तर ते होत नाही. म्हणून मी खवळलो. तुमच्यावर खवळायला मी काही मूर्ख नाही. कुणालाही आपलं कुटुंब समोर दिसलं, तर हुंदका भरून येतो आणि माणूस दोन पावलं मागे येत असतो, याचा विचार करा,” असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.
“…तर मी कुटुंबाला मानत नाही”
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “माझं माझ्या कुटुंबावरही प्रेम आहे आणि माझ्या समाजावरही प्रेम आहे. मात्र, मी एकदा आंदोलनाला बसलो, तर मी कुटुंबाला मानत नाही. मी प्रथम समाजाला मानतो. मी आधी समाजाचा आणि मग कुटुंबाचा आहे. त्यामुळे माझं कुटुंब अशावेळी येत नाही.”
हेही वाचा : उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंचे हात थरथरले; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“कुटुंबाने आंदोलनाच्या ठिकाणी येऊ नये”
“याआधी ते कधीही आलं नाही, पण आता कुटुंब यायला लागलं आहे. कुटुंबानेही येऊ नये. मी पहिला समाजाचा आहे. जगलो तर तुमचा, मेलो तर समाजाचा आहे. कुटुंबाने आंदोलनाच्या ठिकाणी येऊ नये,” असं मनोज जरांगेंनी कुटुंबाला सांगितलं.