Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेले उपोषण मागे घेतले असून राज्यभर शांतता फेरी सुरू केली आहे. यानिमित्ताने ते विविध जिल्ह्यांत जाऊन मराठा बांधवांनी संवाद साधत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण केलं होतं. परंतु, या उपषोणांचा त्यांच्यावर आरोग्यावर परिणाम झाल्याचं त्यांनीच कबुल केलं आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे म्हणाले, “२९ ऑगस्टला तुम्ही आंतरवालीला याच. आता उपोषण करून मलाच कंटाळा यायला लागला आहे. सकाळीच सलाईन लावून आलोय. डॉक्टरांनाच आता कळत नाहीय की सलाईन कुठे लावावी. सर्वच शिरांना सलाईन लावली आहेत. कोणत्याही सलाईन लावली तरी दुसऱ्यात शिऱ्यातून पाणी बाहेर यायला लागलं आहे. आता दोन-चार पायऱ्याही चढता येत नाही. इतका त्रास होतोय. या शेवटच्या उपोषणामुळे खूप हाल झाले. अगोदर बरं होतं. शेवटचं केलं तेव्हापासून त्रास व्हायला लागला आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

हेही वाचा >> विधानसभेला पाडायचे, की उभे करायचे हा निर्णय अंतरवालीतील बैठकीत – मनोज जरांगे

२९ ऑगस्टला घेणार निर्णय

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकार पाडल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असं जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार उभे कऱण्याच्या तयारीत आहेत. याबाबत ते सांगलीच्या सभेत म्हणाले होते की, “विधानसभा निवडणुकीत पाडायचे, की उभे करायचे याचा निर्णय २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीमध्ये होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असून, आता मराठा समाजाने राजकीय पक्ष, नेता याच्या मागे न लागता मुला-बाळांच्या भवितव्यासाठी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हावे.”

तसंच, नेत्यांची माझ्यावर नाराजी असली तर, मराठा समाजाच्या नाराजीचे काय? मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रसह राज्यात संपूर्ण मराठा समाज एक झाला आहे. राजकारण्यांनीच मराठा समाजाची विभागणी केली आहे. मात्र, आता मराठा समाज हुषार झाला आहे. जो मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल अशांनाही राखीव जागांवर पाठिंबा देऊन उभे करण्यात येईल. दहा टक्के आरक्षण आम्ही मागितले नव्हते. मात्र, तरीही सरकारने दिले, ही सरकारची चूक आहे, असंही जरांगे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते.

सागर बंगल्यावरून माझी बदनामी होतेय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा गट तयार केले आहेत असा आरोप करून जरांगे म्हणाले, ज्यावेळी माणूस कशातच सापडत नाही, त्यावेळी बदनामीची मोहीम राबविण्यात येते. बदनामी करण्यासाठी बोलायला लावणारे ठिकाण म्हणजे मुंबईतील उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सागर बंगला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil health update saying last hinger strike was too difficult sgk